स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांविरोधात भाजपचा अविश्वास प्रस्ताव; मुंबई महापालिकेचं राजकारण तापलं

| Updated on: Jan 14, 2022 | 7:04 PM

मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येताच महापालिकेतील राजकारणही तापू लागलं आहे. भाजपने स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात अविश्वास दाखवला आहे.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांविरोधात भाजपचा अविश्वास प्रस्ताव; मुंबई महापालिकेचं राजकारण तापलं
yashwant jadhav
Follow us on

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येताच महापालिकेतील राजकारणही तापू लागलं आहे. भाजपने स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात अविश्वास दाखवला आहे. तसा प्रस्तावच भाजपने महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे दाखल केला असून या संदर्भात तातडीने महापालिका सभा बोलावण्याची मागणी केली आहे.

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हा अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर भाजपच्या आठ नगरसेवकांची सही आहे. अद्यायावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 36 (ह) अन्वये महानगरपालिकेची तातडीची सभा त्वरित बोलविण्यात यावी, अशी आपणांस विनंती करीत आहोत, “हे सभागृह स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरुद्ध स्थायी समिती अध्यक्ष म्हणून अविश्वास व्यक्त करीत आहे,” असं या प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे.

गंभीर आरोपांची जंत्री

भाजपच्या या नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव देताना यशवंत जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आयकर खात्याच्या अहवालानुसार बृहन्मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भ्रष्टाचाराद्वारे जमा केलेले काळे धन सफेद करण्यासाठी पैशाची अवैध अफरातफर केल्याचे निदर्शनास आले आहे. स्थायी समितीच्या सभेत महत्वाच्या विषयावर, आर्थिक भ्रष्टाचारावर, कोविड काळातील गैरव्यवहारावर, शालेय विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीतील भ्रष्टाचारावर, पोयसर नदी मलजल प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावातील भ्रष्टाचारावर सदस्यांना बोलू न देणे, घाईघाईत प्रस्ताव मंजूर करणे तसेच प्रस्तावास तीन सुस्पष्ट दिवस झाले नसताना प्रस्ताव विचारात घेणे या सर्व कायदेविसंगत अनियमितता व लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या वर्तवणूकीबद्दल सदर अविश्वास व्यक्त करीत आहोत, असं भाजपने म्हटलं आहे. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर या भाजपचा हा अविश्वास प्रस्ताव स्वीकारतात की फेटाळून लावतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आठ नगरसेवकांच्या सह्या

या प्रस्तावावर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा, कमलेश यादव, मकरंद नार्वेकर, ज्योती अळवणी, राजेश्री शिरवडकर, विद्यार्थी सिंह, हरिष भांदिर्गे आदी नगरसेवकांच्या सह्या आहेत.

 

संबंधित बातम्या:

मुंबईतील कोळीवाडे, गावठाणातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा, शेलारांची स्वाक्षरी मोहीम

‘फडणवीस हे कुटुंबप्रमुख, दरेकर आणि मी संताजी, धनाजीची जोडी’, नाराजीच्या चर्चेनंतर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया

Pratap sirnaik : हिरानंदानी, लोढा, रुस्तमजी, कल्पतरू यांच्याशी तुमचे लागेबांधे? सरनाईकांचा सोमय्यांना सवाल