Dagdu Sakpal : म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते, हे बोलताना दगडू सकपाळांच्या डोळ्यात पाणी आलं, परळ-लालबागचा ठाकरेंचा गड धोक्यात

Dagdu Sakpal : परळ लालबाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या भागाचे माजी आमदार दगडू सकपाळ यांची काल एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. आज दगडू सकपाळ या भेटीबद्दल टीव्ही 9 मराठीशी बोलले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी होतं.

Dagdu Sakpal : म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते, हे बोलताना दगडू सकपाळांच्या डोळ्यात पाणी आलं, परळ-लालबागचा ठाकरेंचा गड धोक्यात
Dagdu Sakpal
| Updated on: Jan 08, 2026 | 10:06 PM

शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांची भेट घेतली. त्यावरुन परळ-लालबागच्या राजकारणात मोठा भूकंप होणार का? अशा चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. “त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांची तब्बेत खराब झाली होती. त्यामुळे त्यांची सदिच्छ भेट घ्यायला आलो होतो” असं एकनाथ शिंदे यांनी या भेटीबद्दल सांगितलं. या भेटीवर चर्चा सुरु झाल्यानंतर दगडू सकपाळ यांनी टीव्ही 9 मराठीवर प्रतिक्रिया दिली आहे. म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुलीला नगरसेवक पदाची उमेद्वाराची न दिल्याची खंत व्यक्त केली. “भावना व्यक्त करताना सकपाळ भावनिक झाले होते. आज तरी पक्ष सोडण्याचा विचार नाही. कुठे गेलो तरी मातोश्रीवर टिका करणार नाही” असं दगडू सकपाळ म्हणाले.

“मी नाराज आहे. म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री भेटीला येतो, त्याला घराबाहेर नाही काढू शकत. मला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मोठं केलं, मात्र आज अस काय झालं की मला दूर केलं” अशा भावना दगडू सकपाळ यांनी व्यक्त केल्या. “पक्षासाठी खूप खस्ता खाल्ल्या, मला आमदार केलं. मात्र आम्ही सुद्धा घासली. मी नाराज आहे त्याच्याशी शिंदेंचा काही संबंध नाही. त्यांना वाटत गरज संपली, हा म्हातारा झाला” असं दगडू सकपाळ म्हणाले. हे बोलताना दगडू सकपाळांच्या डोळ्यात पाणी आलं.

‘कुणाच्याही मुलीसाठी बाप रडला असता’

“एकनाथ शिंदेंनी कोणातीही प्रस्ताव दिला नाही, मी ही विषय काढला नाही. मला वाटलं असतं तर मी माझ्या मुलीला अपक्ष उभी केली असती आणि निवडूनही आणली असती. पक्ष प्रवेश करणार का? ह्यावर आज बोलू शकणार नाही. उद्या माझ्या मनात आले तर करू शकतो. जो पर्यंत मनात नाही तो पर्यंत डोक्यात कशाला आणायचं?” असं दगडू दादा म्हणाले. “दगळू दादा बोलताना भावनिक झाले होते. त्यांच्या डोळ्यातून भावना व्यक्त होत होत्या. माझी मुलगी नाही कुणाच्याही मुलीसाठी बाप रडला असता. मातोश्री आमचं मंदिर आहे, त्यांच्यावर टिका करणार नाही” असं दगडू सकपाळ म्हणाले.