
मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीसाठी सध्या सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. येत्या १५ जानेवारी रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान पार पडणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने गुरुवार १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने याबाबतचे स्वतंत्र अध्यादेश काढले आहेत. मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांना आपला हक्क बजावता यावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ही सुट्टी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आणि खाजगी कंपन्यांना लागू असणार आहे. विशेष म्हणजे, जे मतदार मुंबईत राहतात पण शहराबाहेर कामाला आहेत, त्यांनाही मतदानासाठी ही सुट्टी लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासकीय अध्यादेशानुसार, ही सार्वजनिक सुट्टी केवळ सरकारी कार्यालयांपुरती मर्यादित नसून ती खालील सर्व क्षेत्रांसाठी बंधनकारक आहे.
विशेष म्हणजे, जे मतदार बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील आहेत, परंतु कामाच्या निमित्ताने शहराबाहेर म्हणजे ठाणे, नवी मुंबई किंवा पालघर या ठिकाणी कामासाठी जातात, त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सुट्टी लागू असेल.
काही अपवादात्मक परिस्थितीत, जिथे कामाचे स्वरूप अत्यंत धोकादायक आहे किंवा जिथे पूर्ण दिवस सुट्टी दिल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते, अशा लोकोपयोगी सेवांसाठी नियमात थोडी शिथिलता देण्यात आली आहे. अशा आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदानासाठी किमान २ ते ३ तासांची विशेष सवलत देणे बंधनकारक आहे. मात्र, यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी किंवा योग्य सबब असणे आवश्यक आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांसाठी पालिकेने विशेष दक्षता पथके तैनात केली आहेत. जर एखाद्या आस्थापनेने सुट्टी किंवा सवलत देण्यास नकार दिला, तर नागरिक ९१२२-३१५३३१८७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात. दरम्यान लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावावा. कामाच्या कारणास्तव कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठीच ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी केले आहे.