
मुंबई महानगरपालिका 2026 ची निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्वाची आहे. ठाकरे बंधुंसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे तर देश, राज्य जिंकणाऱ्या भाजपसाठी मुंबई महापालिका एक अपूर्ण स्वप्न आहे. त्यामुळे भाजप ही निवडणूक जिंकण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावणार हे निश्चित होतं. आता घडतही तसचं आहे. मुंबई आणि आसपासच्या महानगरातील महापालिका जिंकण्यासाठी महायुतीने प्रचाराचा मास्टरप्लान बनवला आहे. 11, 12 आणि 13 जानेवारीला मुंबई, नवी मुंबई, बोरीवली, ठाणे आणि मिरा-भाईंदर या ठिकाणी महायुतीच्या मोठ्या सभा होणार आहेत. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शाह आणि भाजपच्या इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती असणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. विकासाच्या नावावर मुंबईत महायुतीच्या सभांचं आयोजन करण्यात येणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: मुंबईत येत आहेत. त्यांची सभा होणार आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. “महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रपतीला आणलं तरी आश्चर्य वाटणार नाही. परदेशात मोदींना मिठ्या मारणारे लोक आले तरी आश्चर्य वाटणार नाही. भाजपची ती परंपरा झाली आहे. 11 तारखेला मोदी मुंबईत येत आहेत. 13 तारखेला प्रचार संपतोय. एका खास धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे” असं संजय राऊत म्हणाले.
निवडणूक आयोग काय करतोय?
“मुंबईत जैन समाजाच्या एका कार्यक्रमाचं निमंत्रण मोदींनी स्वीकारलं आहे. त्यासाठी ते येत आहेत. त्या समाजाच्या लोकांना प्रभावाखाली घेण्यासाठी येत आहेत. निवडणूक आयोग काय करतोय? राज्य निवडणूक आयोगाचे एक अधिकारी आहेत, वाघमारे. या वाघमारे यांनी आपल्या नावाला जागावं व भाजपच्या लांडग्यांना आवरावं” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.
कल्याण-डोंबिवलीत भाजपच्या विजयाला शुभारंभ
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपा-महायुतीच्या विजयाला शुभारंभ. प्रभाग क्र. 18 मधून रेखाताई चौधरी आणि प्रभाग क्रमांत 26 क मधून आसावरी केदार नवरे यांचा नगरसेविका पदी बिनविरोध विजय झाला. या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी फोन द्वारे दोन्ही विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.