
राज्यात सध्या 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे बहुतांशी ठिकाणचे चित्र स्पष्ट झाले आहे. अशातच आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आदित्य ठाकरेंनी आपल्या अनेक उमेदवारांनी फोन आणि धमक्या आल्याची माहिती दिली आहे. मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे यासाठी आपण लढत आहोत असंही ते म्हणाले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उमेदवारांना या निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत याची माहिती दिली. आदित्य ठाकरे म्हणाले की मुंबईतील जमीन ही मुंबईकरांच्या घरांसाठीच देण्यावर आपला भर असणार आहे. ही जमीन विकासकांमांसाठी दिली जाणार नाही. या जमीनीवर गिरणी कामगारांसाठी, बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्याची आपली योजना आहे. यासाठी मुंबई महापालिका स्वत:च गृहनिर्माण धोरण तयार करेल. एक लाख घरे निर्माण करण्याची योजना आहे.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी, मुंबईकरांच्या खिशाला परवडेल असा बेस्ट प्रवास देण्यावर आमचा भर असणार आहे. तिकीट दरवाढ कमी करून ती 5, 10,15,20 रुपये करणार आहोत. आगामी काळात बेस्टच्या ताफ्यात 10 हजार इलेक्ट्रिक बस सामील करणार आहोत. तसेच 900 डबल डेकर बस खरेदी करणार आहोत. बंद झालेले जुने मार्ग पुन्हा सुरू करण्यावर आपला भर असेल.
मुंबई महापालिकेतील उमेदवारांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी आपण शहरातील सार्वजनिक आरोग्यावर भर देणार असल्याची माहिती दिली. पालिका रुग्णालयांमध्ये जेनरिक ओषधे मोफत देण्याची आपली योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 24 तास हेल्थ केअर कंट्रोल रूम आणि हेल्थ टू होम सेवा सुरू करणार आहोत. तसेच पालिकेचे स्व:ताचे कॅन्सर रुग्णालय असेल असंही यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच पालिकांच्या शाळांमध्ये 12 वी पर्यंत ज्युनियर कॉलेज सुरू करण्यात येईल, तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये बोलतो मराठी हा उपक्रम सुरू करणार असल्याची माहितीही यावेळी आदित्य ठाकरे यांनी उमेदवारांना दिली आहे.