
BCM Election Reservation: राज्यातील जनता आणि राजकीय पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींकडे डोळे लावून बसले आहेत. यावेळीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीवर संपूर्ण देशाची नजर असणार आहे. शिवसेना ठाकरे गट बीएमसी आपल्याकडे ठेवणार की भाजप आणि महायुती बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशातच आता या निवडणूकीबाबत सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आगामी बीएमसी निवडणूकीसाठी येत्या 11 नोव्हेंबर 2025 रोजी आरक्षण सोडत पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवार आणि माजी नगरसेवकांमध्ये उत्सुकतेसह चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण कोणता वार्ड कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार हे 11 तारखेला समजणार आहे. त्यामुळे काही इच्छुक उमेदवारांना याचा फटका बसू शकतो.
आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या काळात प्रस्ताव सादर केला जाणार आहे. आरक्षण सोडतीची जाहीर सूचना 6 नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर आरक्षणाची सोडत 11 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी 11 नोव्हेंबर रोजी सादर केला जाणार आहे.
त्यानंतर, 14 नोव्हेंबर रोजी प्रारुप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी नाटीस प्रसिध्द केली जाणार आहे. 20 नोव्हेंबर ही प्रारुप आरक्षण, हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे. अंतिम आरक्षण विहित नमुन्यात 28 नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाणार आहे.
मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत. यापैकी अनुसुचित जातींसाठी 15 जागा राखीव असणार आहेत. तसेच अनुसुचित जमातींसाठी 2 जागा आणि इतर मागासवर्गीयांसाठी 61 जागा आरक्षित असणार आहेत. उर्वरित जागा या खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत. तसेच एकूण 227 जागांपैकी 50 टक्के म्हणजेच 114 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. आता कोणती जागा कोणत्या प्रवर्गासाठी असणार हे 11 नोव्हेंबरला समोर येणार आहे.