BMC Election : वॉर्ड क्रमांक 1 आरक्षित मग तेजस्वी घोसाळकर आता कुठून निवडणूक लढवणार?

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत. पण या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. यंदा तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक 1 मधून निवडणूक लढवू शकत नाही. मग, त्या कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत?.

BMC Election : वॉर्ड क्रमांक 1 आरक्षित मग तेजस्वी घोसाळकर आता कुठून निवडणूक लढवणार?
tejaswi ghosalkar
| Updated on: Nov 17, 2025 | 4:01 PM

मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या वॉर्ड क्रमांक 1 मधून आता घोसाळकर कुटुंब निवडणूक लढवू शकणार नाही. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत घोसाळकर कुटुंबाचे वर्चस्व होते. मनीषा चौधरी यांच्या आधी शिवसेना नेते विनोद घोसाळकर दहिसर विधानसभेचे आमदार होते. वॉर्ड क्रमांक 1 मधून अभिषेक घोसाळकर 2012 ते 2017 पर्यंत नगरसेवक होते. त्यानंतर तेजस्वी घोसाळकर 2017 ते आतापर्यंत नगरसेविका होत्या. पण आता वॉर्ड क्रमांक 1 महिला ओबीसी झाल्यामुळे हा वॉर्ड घोसाळकर कुटुंबापासून दूर जाणार आहे. सध्या दहिसर विधानसभेचे बहुतेक वॉर्ड भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांकडे आहेत. आता यावेळी दहिसर विधानसभेची जागा कोण जिंकणार? हे ठरायला अजून वेळ आहे.

“माझे वॉर्ड क्रमांक 1 शी कौटुंबिक संबंध होते. विनोद घोसाळकर यांनी आमदार म्हणून काम केले होते. अभिषेक घोसाळकर नगरसेवक होते आणि त्यांच्यानंतर मी तेथून नगरसेविका होती” असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या. तेजस्वी म्हणाल्या की, “आता त्यांची तयारी वॉर्ड क्रमांक 7 किंवा 8 असेल. जर, संधी मिळाली तर वॉर्ड क्रमांक 2 मधूनही निवडणूक लढवू शकतात” तेजस्वी यांनी वॉर्ड क्रमांक 1 महिला ओबीसी झाल्याबद्दल दुःख व्यक्त केले.

तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये काय म्हटलं?

काही महिन्यांपूर्वी पक्षांतर्गत नाराजीतून शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला होता. विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. स्थानिक नेतृत्वावर नाराज होऊन तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी तेजस्वी घोसाळकर या भाजप किंवा शिंदे गटात सहभागी होणार अशी चर्चा सुरु होत्या. पण नंतर ही नाराजी दूर झाली. त्या उद्धव ठाकरे गटामध्येच आहेत. तेजस्वी घोसाळकर या शिवसेना उबाठाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत तसेच शिवसेना उबाठाचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत.

“माझ्या वार्ड क्रमांक 1 मध्ये नागरिक प्रवर्ग म्हणजेच ओबीसी (OBC) आरक्षण घोषित झालं आहे. मी ओबीसी प्रवर्गातील नसल्यामुळे ही निवडणूक लढवू शकत नाही, ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत दुःखद आहे” असं तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं.