
वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे, असे आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते. मात्र तरीही काही ना काही कारणांनी अनेकांना उशीर होतो. मात्र आता वेळ न पाळल्याने एका उमेदवाराची महापालिका निवडणूक लढण्याची संधी हुकल्याचे पाहायला मिळत आहे. मंदाकिनी खामकर असे संधी हुकलेल्या महिला उमेदवाराचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांना भाजपने उमेदवारी देत एबी फॉर्मही दिला होता. मात्र उशीर झाल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे. यामुळे भाजपला मोठा फटका बसला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वॉर्ड क्रमांक २१२ मध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार मंदाकिनी खामकर यांच्या हातात पक्षाचा एबी फॉर्म होता. मात्र तो असूनही केवळ १५ मिनिटांच्या उशिरामुळे त्यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. या तांत्रिक चुकीमुळे भाजपला या वॉर्डात मोठा राजकीय फटका बसला आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मंदाकिनी खामकर यांच्यावर विश्वास टाकत त्यांना वॉर्ड २१२ साठी उमेदवारी जाहीर केली होती. पक्षाकडून त्यांना अधिकृत उमेदवारीचा एबी फॉर्म देखील वेळेत सुपूर्द करण्यात आला होता. मात्र, निवडणूक अर्जासोबत जोडाव्या लागणाऱ्या नवीन बँक खात्याच्या कामासाठी त्या बँकेत गेल्या होत्या. दुर्दैवाने, बँकेतील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. बँकेतील काम आटोपून खामकर जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचल्या, तेव्हा वेळ उलटून गेली होती.
निवडणूक आयोगाच्या कडक नियमांनुसार, अर्ज भरण्याची अंतिम मुदत संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच होती. मंदाकिनी खामकर अवघ्या १५ मिनिटांनी उशिरा पोहोचल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज स्वीकारण्यास कायदेशीररित्या नकार दिला. अर्ज दाखल करण्याची वेळ संपली असून खिडकी बंद झाली आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे हातात पक्षाचे अधिकृत तिकीट असूनही केवळ वेळेच्या व्यवस्थापनात झालेल्या चुकीमुळे खामकर यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावे लागले आहे.
दरम्यान मुंबई महापालिकेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत एका हक्काच्या वॉर्डमध्ये अशा प्रकारे उमेदवारी हुकणे ही भाजपसाठी मोठी नामुष्की मानली जात आहे. वॉर्ड २१२ मध्ये आता भाजपचा अधिकृत उमेदवारच रिंगणात नसल्याने पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. या वॉर्डात आता भाजप कोणाला पाठिंबा देणार की अपक्ष उमेदवाराला ताकद देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.