मध्यरात्री मातोश्रीवरुन थेट मुख्यमंत्र्यांना फोन अन् शिंदेंना मोठा झटका, मुंबई महापालिकेत नेमकं काय घडलं?
मुंबई महापालिकेतील ४ वादग्रस्त प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ स्थगिती दिली आहे. 'मातोश्री'वरून मध्यरात्री आलेल्या फोननंतर ही मोठी कारवाई करण्यात आली असून यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वर्तुळात सध्या अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मुंबईतील मोक्याच्या जमिनी आणि महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत सुधारणा समितीमार्फत घेतल्या जाणाऱ्या चार मोठ्या निर्णयांना तुर्तास ब्रेक लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यरात्री मातोश्रीवरुन फोन जाताच पडद्यामागे गुप्त हालचाली पाहायला मिळाल्या. मध्यरात्री घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या समीकरणाची चर्चा रंगू लागली आहे.
आदित्य ठाकरेंचे गंभीर आरोप
मंगळवारी दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक धडाकेबाज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटावर टीका केली. शिंदे गटाकडून मुंबईतील मोक्याच्या ठिकाणच्या जमिनी लाटण्याचा घाट घातला जात आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला. मुंबई महापालिकेच्या सुधारणा समितीमध्ये सध्या शिंदे गटाचे वर्चस्व आहे. संध्या विपुल दोशी या समितीच्या अध्यक्ष आहेत. ही समिती मुंबईतील मोठे बांधकाम प्रकल्प, रस्त्यांची सुधारणा आणि पायाभूत सुविधांना मंजुरी देणारी अत्यंत महत्त्वाची समिती मानली जाते.
मात्र या सुधारणा समितीच्या माध्यमातून मुंबईतील ४ मोठ्या प्रस्तावांमध्ये प्रचंड अनियमितता करून मोक्याच्या जमिनी आणि सेवा खाजगी हातांमध्ये सोपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात सेव्हन हिल्स रुग्णालय, उपनगरीय रक्तपेढ्या, वांद्रे रिक्लमेशन आणि मलबार हिल ग्रीन झोन या जागांचा समावेश आहे. या सर्व जागांचे खासगीकरण करण्याचा घाट शिंदे गटाकडून घातला जात आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
मिलिंद नार्वेकरांचा देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क
आदित्य ठाकरे यांनी दुपारी पत्रकार परिषद घेत या विषयाला तोंड फोडले. पण यात खरा ट्वीस्ट मध्यरात्री पाहायला मिळाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास आदित्य ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य आणि ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला.
मिलिंद नार्वेकर यांनी बीएमसीच्या या चारही प्रस्तावांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेची आणि त्रुटींची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. मुंबईचे हित लक्षात घेता या करारांना स्थगिती देण्याची विनंती यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात आली. मातोश्रीवरून आलेल्या या फोनची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी रात्रीच भाजपच्या प्रमुख नगरसेवकांकडून आणि नेत्यांकडून या प्रस्तावांचा सविस्तर अहवाल मागवला.
शिंदे गटातील नगरसेवकांचा पाठिंबा
तसेच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या त्या चारही वादग्रस्त प्रस्तावांना तात्काळ स्थगिती देण्याचे आदेश दिले. यामुळे शिंदे गटाच्या अंतर्गत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या संपूर्ण घडामोडींमध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. उपनगरीय रक्तपेढ्यांच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याच्या निर्णयाला खुद्द शिंदे गटातीलच एका नगरसेवकाने पाठिंबा देत आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली. दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर भाजपने थेट समोर न येता पडद्यामागे राहून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
दरम्यान ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील या पडद्यामागील समन्वयामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे. या सर्व पडद्यामागील घटनांमुळे मुंबई महापालिकेतील आगामी राजकीय समीकरणांना कोणते नवीन वळण मिळते, हे पाहणे आता औत्सुकतेचे ठरणार आहे.