मुंबईतील 13 उड्डाणपूल धोकादायक, गणेशमूर्तीच्या वाहतुकीसाठी पालिकेची सूचनावली

| Updated on: Aug 16, 2020 | 10:32 AM

मुंबई महापालिकेच्या वतीने गणेशभक्त आणि गणेश मंडळांना पुलांच्या संभाव्य धोक्याबाबत आवश्यक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील 13 उड्डाणपूल धोकादायक, गणेशमूर्तीच्या वाहतुकीसाठी पालिकेची सूचनावली
Follow us on

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे गणेशमूर्ती प्रतिष्ठापना स्थानी जाण्यास सुरुवात झाली आहे. मात्र मुंबईतील अनेक उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक असल्यामुळे गणेशभक्तांनी मिरवणूक काढू नये, पुलांवर गर्दी करु नये, लाऊड स्पीकर बंद ठेवावा आणि पुलावर थांबू नये असे निर्देश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. बीएमसीने 13 धोकादायक पुलांची यादीही जाहीर केली आहे. (BMC lists 13 Dangerous flyovers in Mumbai warns Ganesh Mandals to avoid)

देशभरात 22 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सव आठवड्यावर आल्यामुळे मूर्ती मंडपांकडे रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. अशा वेळी पालिकेच्या वतीने गणेशभक्त आणि गणेश मंडळांना पुलांच्या संभाव्य धोक्याबाबत आवश्यक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

जाहीर करण्यात आलेले पूल हे अतिशय जुने झाल्याने धोकादायक ठरत आहेत. यामधील काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत, तर काही पुलांच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पालिकेने घालून दिलेले नियम पाळावेत, आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

16 टनांपेक्षा जास्त वजन नको

आगमन- विसर्जनाच्या वेळी मिरवणूक काढू नये, गर्दी टाळावी असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय करीरोड ओव्हरब्रीज, ऑर्थर रोड ओव्हर ब्रीज किंवा चिंचपोकळी रेल्वे ओव्हरब्रीज या पुलांवर भाविक व वाहनांचे मिळून एका वेळेस 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही याची काळजी घ्यावी, पुलांवर लाऊड स्पीकर लावू नये, पालिका आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे निर्देशही पालिकेने दिले आहेत.

कोणते पूल धोकादायक? 

मध्य रेल्वे

घाटकोपर रेल ओव्हर ब्रीज
करी रोड रेल ओव्हर ब्रीज
ऑर्थर रोड/चिंचपोकळी ओव्हर ब्रीज
भायखळा रेल ओव्हर ब्रीज

(BMC lists 13 Dangerous flyovers in Mumbai warns Ganesh Mandals to avoid)

पश्चिम रेल्वे

मरिन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रीज
सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रीज (गँट रोड-चर्नी रोड दरम्यानचा)
फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज (ग्रँट रोड-चर्नी रोड दरम्यानचा)
केनडी रेल्वे ओव्हर ब्रीज (ग्रँट रोड-चर्नी रोड दरम्यानचा)
फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रीज (ग्रँट रोड-मुंबई सेंट्रल दरम्यानचा)
मुंबई सेंट्रल स्टेशनजवळील बेलासीस ब्रीज
महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज
प्रभादेवी-कॅरोल रेल्वे ओव्हर ब्रीज
दादर टिळक रोड रेल्वे ओव्हर ब्रीज

(BMC lists 13 Dangerous flyovers in Mumbai warns Ganesh Mandals to avoid)