
मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अंतर्गत वादाची पहिली ठिणगी पडली आहे. मुंबई महापालिकेच्या मुंबई क्लीन लीग कार्यक्रमात उपमहापौर संजय घाडी यांना डावलून प्रोटोकॉलचा भंग केल्याचा आरोप शिवेसना शिंदे गटाने केला आहे. याप्रकरणी शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्र लिहून संबंधित दोषी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने शहरात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी मुंबई क्लीन लीग या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची प्रमुख उपस्थिती होती. शासकीय शिष्टाचारानुसार (Protocol) महापौर आणि उपमहापौर हे शहराचे प्रथम आणि द्वितीय नागरिक मानले जातात. त्यामुळे व्यासपीठावर किंवा आसनव्यवस्थेत त्यांना मानाचे आणि एकमेकांच्या शेजारील स्थान मिळणे अपेक्षित असते.
मात्र, या कार्यक्रमात उपमहापौर संजय घाडी यांनी महापौर रितू तावडे यांच्या बाजूला स्थान देण्याऐवजी चक्क चौथ्या क्रमांकावर बसवण्यात आले. विशेष म्हणजे, उपमहापौरांच्या आधी भाजपचे आमदार अमित साटम यांना स्थान देण्यात आले. या आसनव्यवस्थेमुळे शिष्टाचाराच्या नियमांची पायमल्ली झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी याबद्दल आयुक्तांना पत्र लिहिले आहे. उपमहापौर हे मानाचे पद असून त्यांना डावलणे हा केवळ व्यक्तीचा नाही, तर त्या पदाचा अवमान आहे. कार्यक्रमाच्या नियोजनात जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणाने प्रोटोकॉलमध्ये त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि ज्या अधिकाऱ्यांनी ही आसनव्यवस्था ठरवली, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमेय घोले यांनी पत्रद्वारे केली आहे.
नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या महायुतीने विजय मिळवला. सत्तेच्या फॉर्म्युलानुसार भाजपकडे महापौरपद, तर शिंदे गटाकडे उपमहापौरपद आले आहे. मात्र, पदभार स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात उपमहापौरांना मिळालेली वागणूक शिंदे गटाच्या जिव्हारी लागली आहे. यामुळे आगामी काळात महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येईल की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या प्रकरणावर आता महानगरपालिका प्रशासन काय खुलासा करते आणि भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये यावर काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.