अबब! 111 शौचकूपे, यांत्रिकपद्धतीने कपडे धुण्याची सुविधा; धारावीत साकारणार सर्वात मोठे सुविधा केंद्र

| Updated on: Mar 06, 2021 | 2:20 PM

मुंबईतील सर्वात मोठे सुविधा केंद्र धारावीत उभारण्यात येणार आहे. (bmc to launch the biggest Suvidha Centre at Dharavi in Mumbai)

अबब! 111 शौचकूपे, यांत्रिकपद्धतीने कपडे धुण्याची सुविधा; धारावीत साकारणार सर्वात मोठे सुविधा केंद्र
Suvidha Centre at Dharavi
Follow us on

मुंबई: मुंबईतील सर्वात मोठे सुविधा केंद्र धारावीत उभारण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या सुविधा केंद्राच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. येत्या सहा महिन्यात हे सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. या दोन मजली सुविधा केंद्रात 111 शौचकूपे असणार आहेत. तसेच आंघोळीची सुविधाही असणार असून यांत्रिकपद्धतीने कपडे धुण्याची सुविधाही असणार आहे. (bmc to launch the biggest Suvidha Centre at Dharavi in Mumbai)

या सुविधा केंद्राची उभारणी ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’ या कंपनीच्या ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’मधून (CSR Fund) करण्यात येणार असून यासाठी सुमारे ९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच ‘युनायटेड वे मुंबई’ या संस्थेचेही सहकार्य या सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी प्राप्त झाले आहे. पुढील सहा महिन्यात धारावीकरांच्या सेवेत रुजू होणाऱ्या या सुविधा केंद्राचा परिसरातील सुमारे ५ हजार व्यक्तींना लाभ होईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

मुंबईतील सहावे, पण सर्वात मोठे पहिलेच सुविधा केंद्र

2016 मध्ये घाटकोपरमधील आझाद नगर परिसरात पहिले सुविधा केंद्र उभारण्यात आले होते. आता महानगरपालिका क्षेत्रातील सहावे सुविधा केंद्र धारावी परिसरात उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे सुविधा केंद्र मुंबईतील सर्वात मोठे सुविधा केंद्र ठरणार आहे. या सुविधा केंद्रात १११ शौचकूप, ८ स्नानगृह आणि कपडे धुण्यासाठी १० मोठ्या आकाराची यंत्रे असणार आहेत.

दोन मजली सुविधा केंद्र

सुमारे 2 हजार 600 चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या व तीन मजली असणाऱ्या (G + 2) या भव्य सुविधा केंद्रामध्ये स्त्री, पुरुष, दिव्यांग, लहान मुले यांच्यासाठी स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणार आहेत. तसेच हे सुविधा केंद्र गंध मुक्त असेल याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

गरम पाणी आणि साबणाची वडी

या सुविधा केंद्रातील स्नानगृहाचा लाभ घेणाऱ्यांना साबणाची वडीही दिली जाणार असून आंघोळ करताना गरम पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सुविधा केंद्राच्या वर वैशिष्ट्यपूर्ण सोलर पॅनल बसविले जाणार आहेत.

पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया केंद्र

अधिकाधिक पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने सौर ऊर्जेचा वापर करण्यासोबतच या सुविधा केंद्रातील वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर होण्याच्या दृष्टीने प्रक्रिया केंद्र देखील कार्यान्वित केले जाणार आहे.

मुलांना मोफत प्रवेश, कुटुंबाला मासिक पास

या सुविधा केंद्राचा लाभ घेणाऱ्यांना प्रति लिटर पाण्यासाठी केवळ एक रुपया शुल्क आकारले जाणार असून परिसरातील नागरिकांना केवळ १५० रुपयात कौटुंबिक मासिक पास दिला जाणार आहे. यामध्ये कुटुंबातील ५ व्यक्तींना निर्धारित सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी लहान मुलांना मोफत प्रवेश असणार आहे. त्याचबरोबर यांत्रिक पद्धतीने कपडे धुण्याची सुविधा देखील या सुविधा केंद्रात अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. (bmc to launch the biggest Suvidha Centre at Dharavi in Mumbai)

 

संबंधित बातम्या:

चंदनाची शेती करा, लाखात नाही कोटीत कमवा; विदर्भ, मराठवाड्यासाठी वरदान? वाचा स्पेशल रिपोर्ट

पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप; माजी रेल्वे मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

भास्कर जाधवांच्या ‘राष्ट्रवादी’वासी मुलाला ZP अध्यक्षपद कसं द्यावं? शिवसेनेला प्रश्न

(bmc to launch the biggest Suvidha Centre at Dharavi in Mumbai)