Mumbai Roads | बोरिवली ते मुलुंड प्रवास फक्त एका तासात शक्य, कसं ते समजून घ्या
Mumbai Roads | बोरिवली आणि मुलुंड ही वेस्टन आणि सेंट्रल लाइनवरची दोन टोकं. पण सरकारकडून एका नव्या प्रोजेक्टवर काम सुरु आहे. त्यामुळे बोरिवलीवरुन मुलूंड किंवा मुलूंडवरुन बोरिवलीला फक्त एकातासात पोहोचण सहज शक्य होणार आहे.

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर दररोज वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चाललाय. अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे 10 ते 15 मिनिटांवर असलेल्या ठिकाणी वाहनाने पोहोचण्यासाठी अर्धा ते पाऊणतास लागतोय. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना बाईकस्वार आणि वाहन चालकांची कसोटी लागतेय. सरकारने रस्ते, ब्रिज या पायाभूत सोयी-सुविधा उभारणीच्या कामाला गती दिली आहे. जेणेकरुन नागरिकांचा वेळ वाचला पाहिजे. आता बोरिवली ते मुलुंड हा प्रवास फक्त एका तासात शक्य होणार आहे. बोरिवली आणि मुलुंड ही वेस्टन आणि सेंट्रल लाइनवरची दोन टोकं. पण एका नव्या पूलामुळे हे अंतर अवघ्या तासाभरावर येणार आहे.
मालाड पश्चिम येथील मालाड हिल रिझरवायर ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स यादरम्यान पालिका 900 मीटर लांबीचा नवीन पूल बांधणार आहे. हा पूल गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडण्यात येणार आहे. यादरम्यानचा सर्व्हिस रोडही सिमेंट-काँक्रीटचा करण्यात येणार आहे. या पुलामुळे बोरिवली ते मुलुंड हा प्रवास अवघ्या एका तासात करता येणार आहे. या कामासाठी पालिका 180 कोटी रुपये खर्च करणार आहे. मुंबईत वाढणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी पालिका मालाड हिल रिझरवायर ते लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जोडणाऱ्या अप्पापाडापर्यंत 18.30 मीटर डीपी रोड फेज वनचा विकास करणार आहे.
सरकार काय नव्याने बांधणार?
यासाठी डिझाईन, बिल्ट, काँक्रीट पूल, स्टील ब्रिज, टनेल ब्रिज व सिमेंट-काँक्रीट कॅवरेझचे बांधकाम तसेच 36.60 डीपी रोडच्या कामासाठी अहवालाची समीक्षा, प्रोजेक्ट रिपोर्ट, गुणवत्ता हमी, गुणवत्ता नियंत्रण व गुणवत्ता ऑडिटसाठी प्रकल्प व्यवस्थापन कन्सल्टंटची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
