मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल पाऊण तास उशिराने
मुंबईत सध्या जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा उशिराने सुरू आहेत. नालासोपारा आणि कल्याण-डोंबिवलीसारख्या परिसरांमध्येही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. आज दिवसभर मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईतील हिंदमाता, किंग्ज सर्कल, परळ यासारख्या सखल भागात पावसाचा मोठा फटका बसला. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेला बसला आहे. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वे उशिराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे सध्या मध्य रेल्वेवरील सर्व लोकल पाऊण तास उशिराने धावत आहेत. अचानक उद्भवलेल्या या तांत्रिक अडचणीमुळे सीएसएमटी जाणाऱ्या आणि तेथून सुटणाऱ्या लोकल सेवांवर परिणाम झाला आहे. तर, पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशिराने सुरू आहे. पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने आणि दृष्यमानता कमी झाल्याने लोकल सेवा धीम्या गतीने धावत आहेत. याचा मोठा फटका चाकरमान्यांना बसला आहे. घरी परतणारे अनेक प्रवासी स्थानकांवर अडकून पडले आहेत.
मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी घरातून बाहेर पडण्यापूर्वी माहितीसाठी संबंधित ॲप्स किंवा सोशल मीडिया खाती तपासण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नालासोपाऱ्यात पावसामुळे रस्ते पाण्याखाली
नालासोपारा पूर्व येथील आचोळा मुख्य रस्ता रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. विरार आणि वसईला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्यावर तब्बल दोन फूट पाणी साचले आहे. यामुळे रुग्णवाहिका, इतर वाहने आणि पादचाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. रात्रीपासून पावसाची उघडझाप सुरू असली तरी, पहाटेपासून परिसरात रिमझिम पाऊस आणि अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत, ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
कल्याण-डोंबिवलीला पावसाचा फटका
याचबरोबर, कल्याण पश्चिम भागालाही पावसाचा फटका बसला आहे. मोहम्मद अली चौक रोडवर पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना वाढत असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
