प्रवाशांकडून वसूल केलेला 33 लाखांचा दंड व्हिडीओ गेम्सवर खर्च, मुंबईत टीसीला बेड्या

मध्य रेल्वेचे टीसी भूपेंद्र वैद्य यांनी प्रवाशांकडून वसूल केलेली दंडाची रक्कम व्हिडीओ गेम्स खेळण्यावर खर्च केल्यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे

प्रवाशांकडून वसूल केलेला 33 लाखांचा दंड व्हिडीओ गेम्सवर खर्च, मुंबईत टीसीला बेड्या
Central Railway
| Updated on: Aug 14, 2019 | 11:03 AM

मुंबई : मध्य रेल्वेचे मुख्य तिकीट पर्यवेक्षक (Central Railway chief ticket examiner) भूपेंद्र वैद्य यांना रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रवाशांकडून दंडाच्या स्वरुपात वसूल केलेली तब्बल 33 लाख रुपयांची रक्कम व्हिडीओ गेम्सवर खर्च केल्याबद्दल यादव यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.

टीसी भूपेंद्र वैद्य यांना व्हिडीओ गेम्स खेळण्याची सवय जडली होती. ठाण्यातील व्हिडीओ गेम्स पार्लरमध्ये ते भरपूर पैसा खर्च करत होते. पार्लर ऑपरेटरने वैद्य आपले नियमित ग्राहक असल्याचा दुजोरा दिला. त्यानंतर वैद्य यांना अटक करुन सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे.

भूपेंद्र वैद्य आपला संपूर्ण पगार व्हिडीओ गेम्स खेळण्यावर घालवत असत. पैशांची कमतरता भासू लागल्यानंतर त्यांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेल्या दंडाच्या रकमेचा गैरवापर करण्यास सुरुवात केली.

डिसेंबर 2018 मध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुरुवातीला वैद्य यांना समज देण्यात आली होती. तसंच व्हिडीओ गेम्सवर वैयक्तिक स्वरुपात खर्च केलेली मध्य रेल्वेची रक्कम परत करण्यास मुदत देण्यात आली होती.
सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी भूपेंद्र वैद्य यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर त्यांनी पाच लाख रुपये परत केले.

उर्वरित रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे वैद्य यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांना सेवेतून निलंबितही करण्यात आलं आहे.