मेगा ब्लॉकमध्ये मध्य रेल्वेचे ‘बेस्ट प्लॅनिंग’, वेळेआधीच कामाचा टप्पा पूर्ण

Mumbai Central Railway mega Block: मध्य रेल्वेने शुक्रवार ३१ मे रोजी मध्यरात्री साडे बारापासून महामेगाब्लॉकला सुरुवात केली होती. नियोजनाप्रमाणे रविवारी २ जून रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक होता. परंतु योग्य नियोजन करुन त्या वेळेआधीच काम पूर्ण करण्यात आले.

मेगा ब्लॉकमध्ये मध्य रेल्वेचे बेस्ट प्लॅनिंग, वेळेआधीच कामाचा टप्पा पूर्ण
mega block
| Updated on: Jun 02, 2024 | 2:01 PM

Mumbai Central Railway mega Block: मध्य रेल्वेवरचा ६३ तासांचा मेगाब्लॉक रविवारी संपुष्टात आला आहे. ठाणे आणि सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सीएसएमटीवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ चे विस्तारीकरण आणि ठाण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ च्या रुंदीकरणाचे काम मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आले होते. त्यातील सीएसएमटी आणि ठाणे येथील स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणचा काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे रविवारी सीएसटीएमवरुन दुपारी १२:३० नंतर वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत. तसेच ठाणे रेल्वे स्थानकावरील काम पूर्ण झाल्यामुळे दुपारी ३ वाजेनंतर लोकल सुरु होणार आहे.

मध्य रेल्वेचे वेळेआधीच काम पूर्ण

मध्य रेल्वेने रविवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगा ब्लॉक नियोजित होता. मात्र त्या आधीच ठाण्यातील आणि सीएसएमटी स्थानकावरील रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले.ठाणे स्थानकाचा पाच नंबर प्लॅटफॉर्म रुंद करून त्या ठिकाणी प्रवाशांना उभे राहण्यास अतिरिक्त जागा निर्माण करण्यात आली. रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्याने पाच नंबर फलाटावरून रेल्वे चालवून चाचणी करण्यात आली. या नवीन बांधलेल्या फलाटांच्या बाजूने लोकल धावली. आता लवकरच अंतिम परवानगी देऊन नवीन फलट वापरासाठी खुला केला जाणार आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी दिसून येत नाही.

९३० लोकल, ७२ एक्स्प्रेस रद्द

मध्य रेल्वेने शुक्रवार ३१ मे रोजी मध्यरात्री साडे बारापासून महामेगाब्लॉकला सुरुवात केली होती. नियोजनाप्रमाणे रविवारी २ जून रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक होता. परंतु योग्य नियोजन करुन त्या वेळेआधीच काम पूर्ण करण्यात आले. या मेगा ब्लॉकमुळे गेल्या ६३ तासांत तब्बल ९३० लोकल गाड्या रद्द केल्या गेल्या. तसेच लांब पल्ल्याच्या ७२ एक्स्प्रेस रद्द केल्या. काही एक्स्प्रेस ठाणे येथे तर काही दादर येथेच थांबवण्यात आल्या.

लांबपल्ल्याचे प्रवास करत आलेल्या प्रवाशांनी तीन तीन महिने आधीच तिकीट बुक केले असते. परंतु मेगा ब्लॉकमुळे त्यांना मध्येच उतरावे लागत आहे. यामुळे लांब पल्याचे प्रवास करणारे प्रवासी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत होते. तिकीट आमचे पूर्ण घेतले तर आम्हाला रस्त्यात का उतरवले जात आहे? असा प्रश्न प्रवासी करत आहेत.