तोंडावर मास्क, हातवारे करत बोलणं अन्… देवेंद्र फडणवीस-संजय राऊतांची खास भेट, 20 मिनिटांमध्ये काय घडलं?

देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही राजकीय मतभेद न ठेवता, सर्वप्रथम संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.  अलीकडेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे राऊत हे विश्रांतीवर होते, त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी विचारपूस केल्याची माहिती  समोर येत आहे.

तोंडावर मास्क, हातवारे करत बोलणं अन्... देवेंद्र फडणवीस-संजय राऊतांची खास भेट, 20 मिनिटांमध्ये काय घडलं?
sanjay raut devendra fadnavis (1)
Updated on: Dec 03, 2025 | 1:48 PM

निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : सध्या महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. एकीकडे ठिकठिकाणी प्रचारसभा, मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते तसेच खासदार संजय राऊत यांची काल रात्री उशिरा एका खासगी कार्यक्रमात भेट झाली. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस हे साधारण २० मिनिटे एकमेकांशी चर्चा करत होते. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

मंगळवारी रात्री उशिरा मुंबईतील एका खासगी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत एकत्र आले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे २० मिनिटे संवाद झाला. याचा एक फोटोही समोर आला आहे. या फोटोत संजय राऊत हे तोंडाला मास्क लावून बसल्याचे पाहायला मिळत आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याशी चर्चा करत असल्याचे दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्या उपचाराबाबतही माहिती घेतली.

संजय राऊत हे अलीकडेच आजारपणातून बरे झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्‍यांनी आपुलकीने त्यांची भेट घेत प्रकृतीबद्दल विचारणा केल्याचे म्हटलं जात आहे. एकीकडे राजकीय टीका-टिप्पणीमुळे सध्याचे वातावरण तापलेले असताना राज्याच्या दोन प्रमुख नेत्यांच्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही भेट केवळ औपचारिक होती की यामागे काही वेगळा हेतू दडलेला आहे, असेही बोललं जात आहे. तसेच या दोघांमध्ये राज्याच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर किंवा आगामी निवडणुकांबद्दल काही महत्त्वपूर्ण चर्चा झाली का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

देवेंद्र फडणवीस हे आमचे मित्र

दरम्यान काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भाष्य केले होते. देवेंद्र फडणवीस हे आमचे कधी काळी जवळचे मित्र होते आणि आम्ही नाती जपतो. आम्ही एकत्र काम केले आहे. आजारपणात त्यांनी स्वत: फोन करुन चौकशी केली. त्यासोबतच सर्व प्रकारची मदतही केली. राजकारण वेगळं आहे. व्यक्तिगत नाती वेगळी आहेत. केंद्रातील जवळपास सर्वच मंत्र्‍यांनी फोन करत माझी चौकशी केली. राजकारणात किती शत्रू असले तरी ते व्यक्तिगत स्तरावर शत्रूत्व येता कामा नये. देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी यांनीही माझी चौकशी केली. मोदी वारंवार चौकशी करत असतात. राज ठाकरे, उद्धव ठाकरेही सतत चौकशी करत असतात, असे संजय राऊत म्हणाले होते.

संजय राऊत बरे झाल्याचा आनंद

तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊत बरे झाले ही आनंदाची गोष्ट आहे. ते बरे झाले याबद्दल मला अतिशय आनंद आहे. ते त्यांचं काम करतात. आम्ही आमचं काम करतो. पण कोणीही आमचा शत्रू नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.