
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वकांक्षी अशी योजना आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारकडून या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातील महिलांना खूश करण्यासाठी राज्य सरकारने या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा पहिला हप्ता याच आठवड्यात शनिवारी 17 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. असं असलं तरी अजूनही काही महिलांचा अर्ज भरण्यात आलेला नाही. त्यामुळे महिला चिंतेत आहेत. असं असताना मंत्रालयातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच योजनेचा आढावा घेत असताना अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसा, राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत महिलांच्या खात्याशी संबंधित काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी महिलांच्या आधार प्रामाणिकरणाला वेळ का लागतोय? या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिले. अद्याप ३८ लाख महिलांचं आधार लिंक न झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंता व्यक्त केली. १५ ऑगस्टच्या आत आधार लिंक करा, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला बाल कल्याण विभागातील सचिवांना दिला.
लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच नेतेमंडळींसाठी महत्त्वाची आहे. कारण आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. राज्यात पुढच्या दोन महिन्यांनी विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या आधी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले तर शिंदे सरकारला त्याचा मोठा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. शिंदे सरकारने याआधी महिलांना एसटी प्रवासासाठी हाफ तिकीटचे पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी बसची सुविधा केली आहे. त्यामुळे त्याचादेखील फायदा महायुती सरकारला होणार आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. ज्या महिलांचे अर्ज 31 ऑगस्टपर्यंत येतील त्यांना येत्या 17 तारखेला दोन महिन्यांचे योजनेचे पैसे मिळणार नाहीत. पण त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात तीन महिन्यांचे पैसे मिळतील, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.