Who is Manikrao Kokate : 5 वेळा आमदार, 4 पक्षांतून उमेदवारी, वादाच्या भोवऱ्यात अडकलेले माणिकराव कोकाटे आहेत तरी कोण?
Manikrao Kokate Journey : सभागृहात रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे चर्चेत आले होते, त्यानंतर आता घोटाळ्याप्रकरणी त्यांना क्रीडा खातं सोडावे लागले आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात.

राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली होती. तसेच कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. आधी सभागृहात रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे चर्चेत आले होते, त्यानंतर आता घोटाळ्याप्रकरणी त्यांचा क्रीडा खातं सोडावे लागले आहे. माणिकराव कोकाटे कोण आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. कोकाटे हे नेहमी चर्चेत असतात. कोकाटे यांनी गेल्या 20 वर्षात अनेक पक्षाचे झेंडे खांद्यावर घेतले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास झालेला आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते अजित दादांसोबत गेले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 41 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता.
चारही पक्षातून निवडणूक लढवली
कोकाटे हे मूळ काँग्रेसी आहेत. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, पक्षाने त्यांना सिन्नरमधून उमेदवारी दिली नाही. त्यांच्या ऐवजी तुकाराम दिघोळे यांना तिकीट दिलं. त्यामुळे कोकाटे यांनी एका रात्रीत शिवसेनेत प्रवेश केला आणि आमदारही झाले. 2004 ची विधानसभा निवडणूक ते शिवसेनेकडून लढले आणि जिंकलेही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासमवेत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. माणिकराव कोकाटे 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून आमदार झाले. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना निवडणुकीचं तिकीटही दिलं. पण कोकाटे यांचा पराभव झाला होता.
मुलीच्या विवाह सोहळ्यामुळे चर्चेत
कोरोना काळात माणिकराव कोकाटे यांनी मुलगी सीमंतिनी यांचा विवाह साध्या पद्धतीने पार पाडणार असं म्हटलं होतं. त्यांनी कन्येचा विवाह नोंदणी पद्धतीने केला. मात्र त्यानंतर नाशिकच्या अकराला गंगापूर-सावरगाव रोडवरील एका रिसॉर्टमध्ये शाही विवाह सोहळा पार पडला. कोरोना काळात नियम मोडून त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहात नृत्यसंगीत, रोषणाई, पाहुण्यांची खास सोय केली होती.
सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ
काही काळापूर्वी कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र फडणवीस सरकारतने त्यांचे खाते बदलले होते. त्यांच्या कडे असलेले खाते काढून घेत त्यांच्यावर क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता सदनिका घोटाळ्यामुळे त्यांच्याकडून क्रीडा खातेही काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
