Shiv Sena MP Meeting : शिवसेनेच्या सर्व खासदारांची उद्या ‘मातोश्री’वर बैठक; राज्यातील परिस्थिती ते महापालिका निवडणुकांवर चर्चा होणार?

| Updated on: Apr 28, 2022 | 12:52 PM

Shiv Sena MP Meeting : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्वच्या सर्व खासदारांची उद्या शुक्रवारी बैठक बोलावली आहे.

Shiv Sena MP Meeting : शिवसेनेच्या सर्व खासदारांची उद्या मातोश्रीवर बैठक; राज्यातील परिस्थिती ते महापालिका निवडणुकांवर चर्चा होणार?
शिवसेनेच्या सर्व खासदारांची उद्या 'मातोश्री'वर बैठक
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: एकीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी शिवसेनेच्या (shiv sena) सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. उद्या 29 एप्रिल रोजी मातोश्रीवर संध्याकाळी ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला सर्व खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती, नवनीत राणा प्रकरण, मनसेचं भोंगे आंदोलन आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतरची शिवसेनेची ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत आणखी काय चर्चा होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे (maharashtra) लक्ष लागले आहे. या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्वच्या सर्व खासदारांची उद्या शुक्रवारी बैठक बोलावली आहे. उद्या सायंकाळी 7 वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. पक्ष संघटनात्मक बाबींवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातं. तसेच या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडींवरही चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सभा आणि बैठका

येत्या 1 मे रोजी राज्यात दोन मोठ्या सभा होणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. ज्या मैदानावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विक्रमी गर्दीची सभा घेतली होती. त्याच मैदानावर आता राज ठाकरेंची सभा होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे इतिहासाची पुनरावृत्ती करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरं म्हणजे राज ठाकरे यांनी भोंग्यांचा विषय हातात घेतला आहे. 3 मेपर्यंत भोंगे हटवण्याची त्यांनी डेडलाईन दिली आहे. त्यामुळे सुद्धा राज ठाकरे या सभेत काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या शिवाय औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे, त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांना बळ देण्याचं कामही राज ठाकरे करणार आहेत.

दुसरीकडे भाजपने मुंबईत पोलखोल अभियान राबवलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागलेल्या भाजपने 1 मे रोजीच मुंबईत सोमय्या मैदानावर विराट सभेचं आयोजन केलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक होत आहे. मागच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले होते. आता उद्धव ठाकरे काय आदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.