शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी, रेल्वे, बसेसमध्ये प्रवासी क्षमता कमी करणार : मुख्यमंत्री

| Updated on: Mar 18, 2020 | 9:28 PM

रेल्वे, एसटी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवाशी क्षमतेने चालवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या (CM Uddhav thackeray On Corona) आहेत.

शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी, रेल्वे, बसेसमध्ये प्रवासी क्षमता कमी करणार : मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण सातत्याने वाढत (CM Uddhav thackeray On Corona) आहे. त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारने केले आहे. काही टक्के जनता या आवाहानाला प्रतिसाद देत असली, तरी अद्याप गर्दी कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

यात “राज्यातील शासकीय कार्यालय एक दिवसाआड पद्धतीने (CM Uddhav thackeray On Corona) रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवाशी क्षमतेने चालवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.”

बेस्टमधील उभे प्रवाशी बंद

“मुंबईत बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढवण्यासाठी बंद असलेल्या शाळेच्या बसेस वापरण्यात येतील.”

“शहरातील सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी आणि दुपारी सुरु होती. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये काही बदल करण्यात येईल.”

साधनसामुग्रीची उपलब्धता

“दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत.”

“ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल.”

जीवनावश्यक वस्तूंचा साठा करू नये

“जनतेने जीवनावश्यक वस्तुंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये. राज्यातील जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व सुरळीत असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.”

या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कोणी व्यापारी साठेबाजी करीत असेल किंवा औषधांच्या, मास्कच्या किंमती अव्वाच्या सव्वा लावत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या (CM Uddhav thackeray On Corona) आहेत.