मोदी-ठाकरेंची फोनवर चर्चा; 18 वर्षांवरील व्यक्तिंच्या लसीकरणाला गती येणार?

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचं वृत्त आहे. (CM Uddhav Thackeray phone call to PM Narendra Modi)

मोदी-ठाकरेंची फोनवर चर्चा; 18 वर्षांवरील व्यक्तिंच्या लसीकरणाला गती येणार?
narendra modi
| Updated on: May 08, 2021 | 1:38 PM

मुंबई: महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचं वृत्त आहे. या दोघांमध्ये फोनवर संभाषण झालं असून त्यात राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. मोदी-ठाकरे यांच्यातील फोनवरील चर्चेमुळे राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तिंच्या लसीकरणाला गती येणार असल्याचं सांगितलं जात आहे. (CM Uddhav Thackeray phone call to PM Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुमारे 15 ते 20 मिनिटे चर्चा झाल्याचं कळतं. यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. रेमडेसिवीर इंजेक्शन्स, ऑक्सिजन, लॉकडाऊन, 18 वर्षांवरील व्यक्तिंचं लसीकरण आणि राज्यातील वाढत्या मृत्यूंवर पंतप्रधानांनी माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थिती पंतप्रधानांना अवगत करतानाच राज्यांच्या गरजाही पंतप्रधानांसमोर मांडल्याचं कळतं.

चर्चा काय?

राज्यात 18 वर्षांवरील व्यक्तिंच्या लसीकरणात येणाऱ्या अडथळ्यांविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालायने ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मुंबई महापालिकेने केलेल्या प्लानिंगचं कौतुक केलं होतं. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची ही चर्चा महत्त्वाची मानली जात होती. दोन्ही नेत्यांनी आज केलेल्या चर्चेचे आगामी काळात सकारात्मक परिणाम दिसून येतील, असं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आभार

यावेळी मोदींनी महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी चांगला मुकाबला करत असल्याचं सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

लसीकरणाला वेग येणार?

दरम्यान, मोदी-ठाकरे यांच्यातील चर्चेमुळे 18 ते 44 वर्षांवरील व्यक्तिंच्या लसीकरणाला वेग येणार असल्याचं सांगितलं जात आहे. रशियाच्या स्पुतनिक-व्ही या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ही महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोदी आणि ठाकरे यांच्या संभाषणाचा प्रमुख रोख हा लसीकरणावरच होता. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसात वेगाने लसीकरण होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यात 54 हजार नवे रुग्ण

राज्यात गेल्या 24 तासांत 54022 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 37386 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 4265326 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 654788 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.36% झाले आहे. (CM Uddhav Thackeray phone call to PM Narendra Modi)

संबंधित बातम्या:

Third Wave : कोरोनाची तिसरी लाट परतवण्यासाठी ठाकरे सरकारचा ॲक्शन प्लॅन, फॅमिली डॉक्टर्सबाबत मोठा निर्णय

लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल

Coronavirus : कोरोनाशी लढायचंय? तर ‘हे’ पदार्थ आहारात असायलाच हवेत, वाचा केंद्राच्या यादीत काय काय?

(CM Uddhav Thackeray phone call to PM Narendra Modi)