मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

त्यामुळे यमाला टाळायचे असेल तर नियम आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत," असे उद्धव ठाकरे म्हणाले. (CM Uddhav Thackeray Speech)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:42 PM, 18 Jan 2021
मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : “सध्या महाराष्ट्र रस्ते अपघातात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मला अपघाताची आकडेवारी कमी नाही करायची, तर मला या यादीत महाराष्ट्राचे नाव नकोच आहे. मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे,” असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्धाटन केले. या उद्धाटनावेळी भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. (CM Uddhav Thackeray Speech During Road Safety Campaign Inauguration)

“रस्ते सुरक्षा हा सप्ताह, महिना यापुरता मर्यादित न राहता ही जीवनशैली व्हावी. नियम आणि संयम या दोन्ही शब्दात यम आहे. जर तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला तर यम भेटीला येतो जो आपला जीव घेऊन जातो. त्यामुळे यमाला टाळायचे असेल तर नियम आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“जनजागृती करणे महत्वाचे”

“रस्ते फक्त माणसचं क्रॉस करत नाहीत तर प्राणी ही करतात. त्यांची ही काळजी घ्यायला हवी. नवीन तंत्रज्ञान, नवीन वेगाच्या गाड्या येत आहेत. त्या दृष्टीने माहिती देणे आणि जनजागृती करणे महत्वाचे आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्तींना धन्यवाद! ते अपघात होऊ नयेत म्हणून जनजागृतीचे महत्वाचे काम करत आहेत. रस्ते नियम पळताना ज्या सोयी सुविधा असतात त्यात सहजता हवी. त्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

“अपघात झाला तर जीव वाचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत”

“अपघात होऊच नयेत म्हणून प्रयत्न व्हावेत. धोक्याचे वळण, अपघाताच्या जागा लक्षात घेऊन ट्रॉमा केअर उभारण्यात यावेत. दुर्दैवाने अपघात झाला तर जीव वाचवण्यासाठी प्रयत्न आणि सुविधा हवी. वाहन चालवण्याच्या प्रशिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सगळे नियम आणि शिस्त याची माहिती हवी. तरच ते प्रशिक्षण देऊ शकतील,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“वाहतूक नियम, शिस्त यांचे पालन करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे. मुलं सज्ञान झाली तर पालक ही सज्ञान होतील,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आज प्रकाशित दिनदर्शिकेमध्ये 12 ते 13 वर्षाच्या मुलांनी रस्ते सुरक्षा चित्र आणि स्लोगन तयार केले आहेत. त्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अपघात कमी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात मुंबई , मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद जिल्ह्यांचा समावेश होता.

टाटा इनिशिटीव्ही आणि परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या वेब सिरीजचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह इतरांनी रस्ता सुरक्षासंदर्भातील शपथ घेतली. परिवहन विभाग आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पिकसलसेन्ट  यांच्यातर्फे आयोजित रस्ता सुरक्षा लघुपट स्पर्धेची घोषणा करण्यात आली. (CM Uddhav Thackeray Speech During Road Safety Campaign Inauguration)

संबंधित बातम्या : 

पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास 20 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची धामधूम, अजित पवारांची प्रतिक्रिया