तुकाराम मुंढेप्रमाणे कारखान्यांच्या गोडाऊनवर धाडी घाला! साखर महागताच कुणी केली मागणी?
Tukaram Mundhe Sugar Factory Godowns: साखरेचा भाव गगनाला भिडला आहे. सणासुदीच्या तोंडावर 75 रुपये किलोचे भाव पाहून ग्राहकांचे तोंड कडू पडले आहे. त्याचवेळी तुकाराम मुंढेंप्रमाणे कारखान्यांच्या गोडाऊनवर धाडी घाला आणि साठा मुक्त करा अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केंद्रावर टीका केली आहे.

साखरेचा भाव 75 रुपयाला भिडताच आता सर्वसामान्यांचा पारा चढला आहे. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांनाही होत नसल्याची ओरड आहे. साखरेच्या वाढत्या दराने कारखानदार आणि व्यापारी खिसा भरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दोघांच्या मिलीभगत मधून साखरेची साठेबाजी करण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात आला आहे. शेतकरी प्रतिनिधींना तुकाराम मुंढे यांची आठवण झाली आहे. सरकारने तुकराम मुंढे यांच्याप्रमाणे राज्यातील कारखान्यांच्या गोडाऊनवर छापे टाकल्यास साखरेचे साठे बाहेर येतील, अशी भूमिका प्रतिनिधींनी घेतली आहे. पंढरपूर येथे आज सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी ही भावना व्यक्त करण्यात आली.
पुढील पाच वर्षे पुरेल इतका साठा
देशातील व्यापाऱ्यांची गोडाऊन तपासल्यास पुढील पाच वर्षे साखर पुरेल इतका साठा सापडेल असा खळबळजनक दावा शेतकरी संघटना प्रतिनिधी दीपक भोसले यांनी केला आहे. साठेबाजांवर कारवाई करायची सोडून सरकार पुढच्या महिन्यात 10 लाख टन साखर आयात करत आहे, त्यावर त्यांनी टीका केली. हा डाव हाणून पाडायचा आहे अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. उत्पादित साखर आणि वितरीत साखरेच्या तफावतीवरही प्रतिनिधींनी बोट ठेवले आहे.
साखरेच्या साठेबाजीवर सडकून टीका
साखरेचे दर वाढले आहेत. केंद्र सरकारने कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी तुटणाऱ्या ऊसाला त्याचा फायदा होणार नसेल तर याबद्दल संशय घ्यायला वाव आहे. महिन्याला वीस लाख टन साखरेचा कोटा दिला जातो. याचा अर्थ असा होतो त्यातून दोन अर्थ निघतात एक तर साखरेची टंचाई असे बसून भरमसाठ साखर साठवून व्यापार्यांनी विकायची आहे. साखर साठवून ठेवायची आणि चढ्या दराने विकायची आहे. साखरेचे दर वाढवून काही लोक पैसे कमावतात याची चौकशी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
शेजारच्या देशात साखरेचे दर स्थिर आहेत. तीन लाख टन साखर देशाबाहेर गेली असेल तर गृहमंत्री, अन्न व नागरी पुरवठा काय करत होते. प्रत्येक कारखान्याकडे 15 ते 20 टक्के साखर शिल्लक आहे. कारखान्यांनी एफआरपी दिली म्हणजे ते काही उपकार करत नाही. 30 लाख टन इथॅनॉलला साखर वापरली गेली. इथेनॉलचा आणि साखर दरवाढीचा काही संबध नाही. येणाऱ्या सिझनमध्ये साखरेचे दर वाढविले नाहीत तर अजून भाव वाढतील, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
साखर आयातीला विरोध
परदेशातून साखर आयातीला रयत क्रांती संघटनेचा व शेतकरी संघटनांचा विरोध असून निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन उभ करू असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व साखर नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलावडे यांनी दिला आहे. साखर आयातीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रतिनिधी आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत.