तुमचं वय 59 वर्षे 3 महिन्यांहून अधिक आहे? तरीही तुम्ही कोरोना लसीकरणास पात्र

| Updated on: Mar 15, 2021 | 10:17 AM

खासगी रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रे 24 तास सुरु ठेवण्यास नुकतीच मुभा मिळाली आहे. (Corona Vaccination Mumbai Age limit)

तुमचं वय 59 वर्षे 3 महिन्यांहून अधिक आहे? तरीही तुम्ही कोरोना लसीकरणास पात्र
Follow us on

मुंबई : मुंबईत दररोज एक लाख व्यक्तींना कोरोना लसीकरण (Corona Vaccination) करण्याचं मुंबई महापालिकेचं लक्ष्य आहे. कोरोना लस घेण्यास पात्र ठरण्यासाठी 1 जानेवारी 2022 रोजी असलेले वय लक्षात घेतले जाणार आहे. त्यामुळे ज्यांचं वय सध्याच्या घडीला 59 वर्षे 3 महिन्यांहून अधिक आहे, त्या व्यक्ती कोरोना लस घेण्यास पात्र ठरतील. (Corona Vaccination Mumbai What is the Age limit)

लसीकरण केंद्र 24 तास करण्याचे प्रयत्न

मुंबईत सध्या सुरु असणारी कोरोना लसीकरण केंद्रे ही 8 ते 12 तास या कालावधीसाठी कार्यरत आहेत. ती 24 तास कार्यरत झाल्यास दिवसाला एक लाख व्यक्तींचे लसीकरण करणे सहज शक्य होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेने व्यक्त केला आहे. आणखी 29 रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेद्वारे यापूर्वीच शासनाकडे पाठवण्यात आला आहे. खासगी रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रे 24 तास सुरु ठेवण्यास नुकतीच मुभा मिळाली आहे.

वयाचे निकष काय?

वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींचे सध्या लसीकरण करण्यात येत आहे. 45 ते 59 या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचेही लसीकरण सुरु आहे. या दोन्ही वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी 1 जानेवारी 2022 रोजीचे वय विचारात घेतले जात आहे. यानुसार आज ज्यांचे वय 59 वर्षे 3 महिने किंवा सहव्याधी असणाऱ्या गटातील व्यक्तीचे वय 44 वर्षे 3 महिने असले तरीही त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य आहे.

एका महिन्यात सर्वच ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण

मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे 30 लाखांच्या घरात आहे. ही बाब लक्षात घेतल्यास तसेच दिवसाला 1 लाख व्यक्तींचे लसीकरण झाल्यास साधारणपणे महिनाभरात मुंबईतील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झालेले असेल.

त्या केंद्रांची मान्यता रद्द करणार

ज्या रुग्णालयांना लसीकरण केंद्रे सुरु करण्यास यापूर्वीच केंद्र सरकारद्वारे परवानगी मिळाली आहे. परंतु ज्यांनी अद्याप लसीकरण केंद्र सुरू केले नाही, अशा रुग्णालयातील लसीकरण केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या, अजितदादांची मोदी सरकारकडे मागणी

(Corona Vaccination Mumbai What is the Age limit)