
अरबी समुद्रात शक्ती नावाचे चक्रीवादळ सक्रिय झाले आहे. ते पुढील काही तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या वादळाचा परिणाम मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी भागात होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. या वादळामुळे राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस, जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह वातावरणात अचानक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य धोक्यामुळे कोकण किनारपट्टीवर प्रशासन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्णपणे सतर्क झाले आहे. त्यामुळे आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने सुरू करण्यात आल्या आहेत.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. विशेषतः मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांना हवामान खात्याने सावधान राहण्याचे आवाहन केले आहे. या वादळाच्या परिणामामुळे पुढील काही दिवसांत या भागांमध्ये हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत. काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची, तर जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच विजांच्या कडकडाटासह वातावरणात अचानक बदल होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टीजवळील नागरिकांनी आणि पर्यटकांनी अत्यंत खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मराठवाडा भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत पोहोचवण्यासाठी तयारी केली आहे. या काळात समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनाऱ्याजवळ फिरणे किंवा समुद्रात न जाणे याबद्दलचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, फक्त अधिकृत सूचना आणि आदेशांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
चक्रीवादळाचा थेट धोका लक्षात घेऊन सिंधुदुर्ग किनारपट्टीसह कोकणातील सर्वच बंदरांवर दोन नंबरचा बावटा फडकावण्यात आला आहे. हा मच्छीमारांसाठी धोक्याचा स्पष्ट इशारा आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, उरण या भागांमध्ये मच्छीमारांना बंदरावर थांबवण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ४ ते ५ ऑक्टोबर दरम्यान समुद्रात ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या समुद्रात लाटांची उंचीही वाढली आहे.