आशा आहे, पुन्हा नक्की भेटू… अभिजीत दीपकेंच्या दोन ओळीच्या पोस्टने चिंता वाढली; काय घडणार?

दिल्लीत अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील सीजेपीच्या आंदोलनाने तणाव वाढला आहे. दीपके यांच्या 'आशा आहे, पुन्हा नक्की भेटू' या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चिंता वाढली असून दिल्लीत काय घडणार याकडे लक्ष लागले आहे. पोलिसांनी २०० कार्यकर्त्यांची धरपकड केली असून जंतर मंतर परिसरात इंटरनेट बंद करून कडक निर्बंध लादले आहेत.

आशा आहे, पुन्हा नक्की भेटू... अभिजीत दीपकेंच्या दोन ओळीच्या पोस्टने चिंता वाढली; काय घडणार?
Abhijeet Dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 7:06 AM

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात कॉकरोच जनता पार्टीचं आज दिल्लीत दुसरं आंदोलन होत आहे. या आंदोलनाची सीजेपीने जोरदार तयारी केली आहे. तसेच आंदोलनाला अटकाव करण्यासाठी दिल्ली पोलिसांनीही तयारी केली आहे. त्यामुळे दिल्ली आज पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अभिजीत दीपके सकाळीच मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. दिल्लीला जाण्यापूर्वी दीपके यांनी इन्स्टावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून दीपके यांनी बरंच काही सांगितलं आहे. त्यामुळे दिल्लीत आज काय घडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अभिजीत दीपके यांनी इन्स्टावर पोस्ट करून आपण दिल्लीला जात असल्याचं म्हटलं आहे. विमानतळाच्या दिशेने निघालो आहे. फक्त एवढंच सांगायचंय की, तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम आहे! तुम्ही मला दिलेलं प्रेम, पाठिंबा आणि माझ्यावर दाखवलेला विश्वास यासाठी मी सदैव ऋणी राहीन. पुन्हा भेटू तोपर्यंत निरोप! (आशा आहे, पुन्हा नक्की भेटू!) जय हिंद!, असं दीपके यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दीपके यांनी आसा आहे, पुन्हा नक्की भेटू, असं म्हटल्याने चिंता वाढली आहे. दिल्लीत काय घडणार याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Loading...

 

जगण्याच्या दोन पद्धती

त्यानंतर दीपके यांनी एक इमेज शेअर केली आहे. त्यावर त्यांनी हिंदीतून मजकूर लिहिला आहे. आयुष्य जगण्याच्या दोनच पद्धती आहेत, एक म्हणजे जे होतंय ते होऊ द्या. सहन करा. नाही तर मग ते बदलण्याची जबाबदारी उचला, असं या पोस्टमध्ये दीपके यांनी म्हटलं आहे.

200 जणांची धरपकड

दरम्यान, पोलिसांनी आज सकाळपासूनच सीजेपीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. सकाळी अवघ्या काही तासात 200 कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. पळून पळून कार्यकर्त्यांना पकडलं जात आहे. हे आंदोलन मोडीत काढण्याचा जणू पोलिसांनी चंगच बांधला असल्याचं या कारवाईतून दिसत आहे.

इंटरनेट बंद, रस्ते बंद

जंतर मंतर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद, इंटरनेट बंद करण्यात आले आहेत. या संपूर्ण परिसराला छावणीचं रुप आलं आहे. जंतर मंतर परिसरात कलम 163 लागू आहे. त्यामुळे या परिसरात दिसेल त्या आंदोलकांना डिटेन करण्यात येत आहे. पोलीस शोधू शोधू आंदोलकांना डिटेन करत आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us