DIG मोरेंकडून तरुणीचा विनयभंग प्रकरण, ‘मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हर’च्या नावे पीडित कुटुंबाला धमकी

| Updated on: Jan 09, 2020 | 8:45 AM

मंगळवारी कोर्टात सुनावणी होण्यापूर्वी पीडितेच्या कुटुंबाला दिनकर साळवे नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याची माहिती आहे.

DIG मोरेंकडून तरुणीचा विनयभंग प्रकरण, मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरच्या नावे पीडित कुटुंबाला धमकी
Follow us on

नवी मुंबई : डीआयजी निशिकांत मोरे यांनी अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात नवीन नाट्य निर्माण झालं
आहे. ‘मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रायव्हर बोलत आहे, या प्रकरणात गप्प राहा’ असं सांगून पीडितेच्या कुटुंबाला धमक्या येत असल्याचा आरोप (DIG Nishikant More Molestation Case) होत आहे.

मोटर ट्रान्सपोर्ट विभागाचे डीआयजी निशिकांत मोरे यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणारी अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली आहे. या मुलीने घर सोडण्यापूर्वी रेल्वेखाली जाऊन आत्महत्या करणार असल्याची ‘सुसाईड नोट’ लिहिली होती. या चिठ्ठीमध्ये तिने माझ्या आत्महत्येली डीआयजी निशिकांत मोरे जबाबदार असल्याचंही लिहिलं होतं. पोलिसांची पाच पथकं बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेत आहेत.

त्याच वेळी, पीडितेच्या कुटुंबाला ‘मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरच्या नावे’ धमक्या येत आहे. दिनकर साळवे असं धमकी देणाऱ्या ड्रायव्हरचं नाव आहे. आधी त्याने आपण निशिकांत मोरेंच्या गाडीचा ड्रायवर असल्याची साळवेची कबुली दिली होती. कोर्ट परिसरातच साळवेकडून ‘गप्प राहा’ अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. मंगळवारी कोर्टात सुनावणी होण्यापूर्वी धमकी दिल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सहा महिन्यापूर्वी पीडित मुलीच्या वाढदिवशी डीआयजी निशिकांत मोरे यांनी मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. यानंतर पीडितेने तळोजा पोलिस ठाण्यात मोरेंविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. पण सहा महिने उलटूनही पोलिसांनी दखल घेतली नव्हती. काही दिवसांपूर्वी पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांच्या हस्तक्षेपानंतर मोरे यांच्यावर पोक्सोअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून ते पसार झाले आहेत. पोलिस मोरेंचा शोध घेत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पीडित मुलीच्या वडिलांनी 5 जून 2019 रोजी खारघरमध्ये तिच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी त्यांनी आरोपी डीआयजी निशिकांत मोरे यांनाही बोलावलं होतं. वाढदिवस साजरा करताना मुलीच्या भावाने तिच्या चेहऱ्यावर केक लावला. त्यानंतर आरोपी मोरे यांनी पीडित मुलीच्या शरीरावरील केक जिभेने चाटला. आरोपी मोरेंच्या पत्नीनेच याचा व्हिडीओही तयार केला होता. हा व्हिडीओ पीडित मुलीच्या पालकांना पाठवत आरोपी मोरेंपासून सावध राहण्याचा सल्लाही दिला होता.

या प्रकरणानंतर पीडित मुलीने आरोपी मोरेंविरुद्ध तक्रार दाखल केली. तर संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी मोरे यांनी पीडित मुलीच्या वडिलांना धमकी दिली होती, असं पीडितेच्या वडिलांनी सांगितले. विशेष म्हणजे ही घटना होऊन 5 महिने उलटूनही पोलिसांनी या प्रकरणाची कोणतीही गंभीर दखल न घेता गुन्हाही दाखल केला नव्हता.

आरोपी निशिकांत मोरेंकडून पीडितेवर पाळत 

पीडित मुलगी 21 डिसेंबर 2019 रोजी खारघर येथील एका शॉपिंग सेंटरमध्ये वही खरेदीसाठी गेली होती. आरोपी मोरे यांनी तिथेही पीडितेचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. आरोपी मोरे पाठलाग करत असल्याचं लक्षात येताच मुलीने या प्रकाराची माहिती वडिलांना दिली. यानंतर पीडितेच्या वडिलांनी घटनास्थळी येऊन आरोपीचा चालक आणि अन्य एक कर्मचारी यांना थेट खारघर पोलीस ठाण्यात आणले होते.

खारघरमधील शॉपिंग सेंटरमध्ये मुली ट्युशनसाठी जातात. याच ठिकाणी डीआयजी मोरे माझ्या मुलीचं अपहरण करण्यासाठी पोलिसांच्या गाडीमध्ये आल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला होता. (DIG Nishikant More Molestation Case)