कल्याणमध्ये पुन्हा गायकवाड विरुद्ध गायकवाड संघर्ष पेटला? शासकीय अधिकारी अडचणीत?

Kalyan News: कल्याण पूर्वेतील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर झाली होती. या मदतीचे धनादेश माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देण्यात आला. त्यावरुन शिवसेना नेते महेश गायकवाड आक्रमक झाले आहे.

कल्याणमध्ये पुन्हा गायकवाड विरुद्ध गायकवाड संघर्ष पेटला? शासकीय अधिकारी अडचणीत?
mahesh gaikwad ganpat gaikwad
| Updated on: Jun 17, 2025 | 8:27 AM

Mahesh Gaikwad news: कल्याणमधील शिवसेना आणि भाजप पदाधिकऱ्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचा वाद राज्यभर चर्चेत आला होता. शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांना अटक झाली आहे. ते कारागृहात आहे. आता गायकवाड गटातील वाद पुन्हा समोर आला आहे. या वादात शासकीय अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. शासकीय मदतीच्या वाटपावरुन गायकवाड विरुद्ध गायकवाड संघर्ष पेटला आहे.

आता का पेटला वाद?

कल्याण पूर्वेतील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर झाली होती. या मदतीचे धनादेश माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देण्यात आला. भाजप आमदार आणि गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयात धनादेशाचे वाटप झाले. या वाटपप्रसंगी महसूल अधिकारी उपस्थित होते. यावरुन कल्याण पूर्वमधील राजकारण तापले आहे.

महेश गायकवाड यांचा आरोप काय?

सरकारी रक्कम देऊन स्वतःच्या झोळीत पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यावर केला आहे. ते म्हणाले, अतिशय लाजरवाणी बाब समोर आली आहे. राज्य सरकारने निधी जाहीर केला. तो निधी माजी आमदाराच्या वाढदिवसानिमित्त दिला गेला. कल्याण पूर्वमध्ये अशा अनेक दुर्घटना यापूर्वीही घडल्या. त्या दुर्घटनेमधील बाधित लोकांना कधी दहा रुपयांचा निधी त्या लोकांनी दिला नाही. परंतु आता शासनाचा निधी माजी आमदाराच्या वाढदिवशी दिला गेला. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन तहसीलदार व संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी महेश गायकवाड यांनी केली आहे.

आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितले की, सप्तशृंगी इमारत दुर्घटना २० मे रोजी झाली होती. त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली. त्याचे धनादेशाचे वाटप माझ्या कार्यालयात करण्यात आले.