
Mumbai Bad Air: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. मुंबईत दृश्यमानता कमी झाली आहे. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतलेली आहे. इथिओपियात ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि त्याची राख वाहत आली आहे. त्यामुळे मुंबईत हवेची गुणवत्ता खालवल्याचा दावा सरकारी पक्षाने यावेळी केला. त्यावर हायकोर्टाने सरकारचे कान टोचले. या घटनेपूर्वी शहरातील हवा खराब होती असे न्यायालयाने सुनावले. शहरातील हवेचा दर्जा खराबच होता अशा शब्दात गुरुवारी हायकोर्टाने खडसावले. आज या प्रकरणात पुन्हा सुनावणी होणार आहे.
इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडले खापर
दोन दिवसांपूर्वी इथिओपियातील ज्वालामुखी उद्रेक झाला. त्यातून राख बाहेर पडली. राखेचे ढग आफ्रिकेसह आशियाकडे सरकले. भारतात हे राखेचे ढग आले. त्यामुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावला अशी बाजू अतिरिक्त सरकारी वकिलांनी मांडली. मात्र न्यायालयाने सरकारचा हा दावा फेटाळला. दोन दिवसांपूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक झाला नव्हता. तरीही हवेचा दर्जा खराब होता असे हायकोर्टाने सुनावले.
हवेचा निर्देशांक 300 पेक्षा अधिक
मुंबईतील हवेचा निर्देशांक सातत्याने घसरत आहे. शहरातील हवेचा निर्देशांक 300 पेक्षा अधिक आहे असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील डी. खंबाटा यांनी केला. यामुळे हवा खराब झालीच आहे. पण दृश्यमानता पण घसरली आहे. अगदी जवळचे सुद्धा योग्य दिसत नसल्याचे म्हणणे मांडण्यात आले. याची न्यायालयाने दखल घेतली.
इथिओपियातील ज्वालामुखी उद्रेकापूर्वीही मुंबईत 500 मीटरच्या पुढील दृश्यमानता कमी होती असा दाखला न्यायालयाने यावेळी दिला. तर या प्रकरणी आता सरकार कोणती उपाय योजना करणार आहे याची विचारणा हायकोर्टाने केली. दिल्लीतील खराब हवेचा संदर्भ देत न्यायालयाने सरकार काय उपाय योजना करणार याविषयी न्यायालयाने प्रश्न विचारला.
ही सुमोटो याचिका यापूर्वी 2023 मध्ये न्यायालयाच्या समोर आली होती. दरम्यान मुंबई महापालिकेचे आयुक्त भुषण गगराणी यांनी सीएनबीएस टीव्ही 18 ला दिलेल्या माहितीनुसार, महापालिका या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. हवेची गुणवत्ता सुधारावी आणि दृश्यमानता वाढावी यासाठी जागोजागी पाणी फवारण्यात येत आहे. रस्ते स्वच्छ करण्यात येत आहेत. तर ज्या प्रकल्पांमुळे वायू प्रदुषण होत आहे ते त्वरीत थांबवण्यास सांगण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.