लॉकडाऊनमध्ये घरभाड्यासाठी तगादा नको, भाडेवसुली तीन महिने पुढे ढकला: गृहनिर्माण विभागाचा प्रस्ताव

| Updated on: Apr 17, 2020 | 3:31 PM

लॉकडाऊनच्या काळात सर्वकाही ठप्प असल्यामुळे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. त्यात घरभाड्याचाही (Housing Minister proposal about House rent ) समावेश आहे.

लॉकडाऊनमध्ये घरभाड्यासाठी तगादा नको, भाडेवसुली तीन महिने पुढे ढकला: गृहनिर्माण विभागाचा प्रस्ताव
Follow us on

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात सर्वकाही ठप्प असल्यामुळे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. त्यात घरभाड्याचाही (Housing Minister proposal about House rent ) समावेश आहे. त्यामुळेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घरभाड्याबाबत एक प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवला आहे. त्यानुसार घरमालकांनी भाडेकरुंना भाडे दिलं नाही म्हणून घराबाहेर काढू नये, तसंच किमान तीन महिने भाडेकरुंना वेळ द्यावा, असं या प्रस्तावात म्हटलं आहे. सध्या हा केवळ प्रस्ताव आहे, निर्णय झालेला नाही. (Housing Minister proposal  about House rent )

घरमालकांनी भाड्यासाठी तगादा लावू नये, माणुसकी दाखवून थोडासा दिलासा द्यावा हा त्यामागचा हेतू आहे, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

पुढचा काळ कठीण आहे, संकटाच्या काळात गरिबांच्या मागे उभं राहणं आवश्यक आहे. गरिबांना त्रास होऊ नये ही सरकारची भावना आहे. महिनाभर घरात आहे, राहायचं काय, खायचं काय, हा प्रश्न गोरगरिबांना आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने भाडेकरुंना दिलासा दिला, तर बरं होईल. तीन महिने भाडे पुढे ढकलावं, असं आवाहन आव्हाडांनी केलं आहे.

घरमालकांनी भाडेकरुला घराबाहेर काढू नये. भाड्याचा ताण तातडीने देऊ नये. लोकांना घराबाहेर काढलं तर ते जाणार कुठे हा मोठा प्रश्न आहे, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.

भाडे काही लाखोंच्या घरात नाही. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात सर्वांनी माणुसकी दाखवावी, सगळ्या गोष्टींचा विचार करुन हा प्रस्ताव तयार करत आहोत, असं आव्हाडांचं म्हणणं आहे.