
मुंबईतील वांद्रे इथल्या किल्ल्यावर दारूपार्टी सुरू असल्याचा व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केला आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे, असा सवाल करत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये वांद्रे किल्ल्यावर जंगी दारूपार्टी होत असल्याचं पहायला मिळतंय. आश्चर्याची बाब म्हणजे किल्ल्यावरील या दारू पार्टीचे संयोजक ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर ऐतिहासिक वास्तूवर दारूपार्टीला परवानगी मिळतेय कशी, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. संंबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या आणि नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिका परवानगी देतंच कसं? आणि किल्ल्यावरील या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग? नक्की काय सुरु आहे? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे सो कॉल्ड ‘सांस्कृतिक मंत्री’ आशिष कुरेशी,’ असा सवाल चित्रे यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि @mybmc @mybmcWardHW… pic.twitter.com/pV1Urn0C6b
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) November 16, 2025
‘सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे, हेच भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती,’ अशी टीका त्यांनी केली आहे. हा व्हिडिओ स्थानिक रहिवाशांनी रविवारी रात्री उशिरा, 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्री काढलेला असल्याचंही त्यांनी पोस्टच्या अखेरीस स्पष्ट केलं आहे.
“किल्ल्यावर दारुपार्टी आणि त्याला परवानगी, हे तर अती झालंय. ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं, हा त्यामागचा उद्देश दिसतोय. तुम्ही परवानगी देताच कशी? ज्या अधिकाऱ्यांनी या दारुपार्टीला परवानगी दिली, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. उत्पादन शुल्क विभागाने लाच घेऊन ही परवानगी दिली आहे. पवित्र स्थळाचं पावित्र्य घालवण्याचं पाप त्यांनी केलं”, असा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी होत असतील तर कारवाई होईल, असं अमित साटम यांनी स्पष्ट केलं.