Varsha Sanjay Raut | वर्षा संजय राऊत यांची ईडी चौकशी का? वाचा सविस्तर

| Updated on: Dec 28, 2020 | 10:37 AM

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे ईडीचे आदेश

Varsha Sanjay Raut | वर्षा संजय राऊत यांची ईडी चौकशी का? वाचा सविस्तर
वर्षा संजय राऊत यांना कोरोनाची लागण
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून (PMC Bank Scam) संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस (ED Notice) पाठवली. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (ED summons Varsha Raut wife of Shivsena High Profile leader Sanjay Raut)

वर्षा राऊत यांना नोटीस का?

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.

संजय राऊतांनी दावा फेटाळला

दरम्यान, वर्षा राऊत यांना ईडीने तिसऱ्यांदा नोटीस पाठवल्याचं सूत्रांनी सांगितलं. परंतु संजय राऊत यांनी आपल्याला अशी कोणतीही नोटीस आली नसल्याचा दावा केला आहे. “माझा माणूस मी भाजप कार्यालयात पाठवला आहे, ईडीची नोटीस कालपासून शोधत आहे” अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. नोटीस आल्याच्या दिवशीही संजय राऊत यांनी “मला याची काहीही कल्पना नाही. माझ्यापर्यंत याबाबत काहीही माहिती नाही. जर घरी नोटीस आली असेल, तर मी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेईन आणि माहिती देईन” अशी प्रतिक्रिया दिली होती.

ईडीने पाठललेल्या नोटिशीचं वृत्त समोर आल्यानंतर संजय राऊत यांनी हिंदीमध्ये ट्विट केलं होतं. “आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया” असं म्हणत अप्रत्यक्षपणे ईडीला आव्हानच दिलं होतं.

राऊतांच्या प्रतिज्ञापत्रात ‘त्या’ व्यवहाराचा उल्लेख?

संजय राऊत यांनी 2016 मध्ये राज्यसभेच्या उमेदवारीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 55 लाखांचा व्यवहार कर्ज म्हणून नमूद केला होता, अशी माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिली आहे. त्यामुळे या व्यवहाराचं नेमकं कनेक्शन काय, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

ईडीच्या रडारवर कोण?

पीएमसी बँक आणि एचडीआयएलच्या वाधवान ग्रुपचा समावेश असलेल्या 4 हजार 355 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी ईडी करत आहे. याआधी शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि त्यांची मुलं विहंग-पूर्वेश सरनाईकही ईडीच्या रडारवर आहेत. तर दोनच दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनाही ईडीने समन्स बजावलं होतं.

काय आहे PMC बँक घोटाळा?

पीएमसी बँक खोटे खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये मिळाली होती. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर 24 सप्टेंबर 2019 रोजी निर्बंध लादले. हे निर्बंध 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.

पीएमसी बँक प्रकरणी ठाकरे सरकारचा निर्णय

ठाकरे सरकारने सप्टेंबर महिन्यात पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला होता. या घोटाळ्यातील रक्कम वसुलीसाठी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि एचडीआयएलची मालमत्ता विकून वसुली करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. या मालमत्तेचा लिलाव करुन पैसे वसूल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली होती. (ED summons Varsha Raut wife of Shivsena High Profile leader Sanjay Raut)

ईडीचा खेळ नवा नाही : नवाब मलिक 

महाराष्ट्रात ईडीचा खेळ आणि वापर नवा नाही. भाजपच्या विरोधात जे आहेत, त्यांना सूडबुद्धीने ही नोटीस पाठवली जाते. याची दोन कारणं आहेत, एक म्हणजे त्यांची बदनामी करण्याची आणि दुसरं भीती निर्माण करण्याची, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला.

विरोधात गेल्यावर कारवाई : सचिन सावंत 

“भाजपची जी आलिशान कार्यालये आहेत, त्यामध्ये ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांनी कार्यालये शिफ्ट करावीत. त्यांनी अधिकृतपणे त्याबाबत घोषणा करावी. ईडी भाजपच्या विरोधकांसाठी काम करत आहे. भाजपचे विरोधक आहेत म्हणून जुने प्रकरण उगाळून काढून केवळ त्रास दिला जात आहे. जनतेलाही हे समजलं आहे. ईडीने आता नाटकबाजी करण्यापेक्षा भाजपच्या विरोधकांसाठी आम्ही करत आहोत ते अधिकृतपणे सांगावं” अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली.

चांगलं काम केलं तर नोटीस मिळत नाही : फडणवीस

“मी ईडी प्रवक्ता नाही, त्यांनाच विचारा. कुणी चांगलं काम केलं तर त्यांना नोटीस मिळत नाही. चूक नसेल तर कुणी घाबरण्याचे कारण नाही”, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता.

संबंधित बातम्या :

संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?

पत्नीला ईडीची नोटीस, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

(ED summons Varsha Raut wife of Shivsena High Profile leader Sanjay Raut)