Purnekar Case : पूर्णेकर यांच्या हत्येनंतर एकनाथ शिंदे यांचा पहिला फोन कुणाला? काय झालं बोलणं?
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून निष्पक्ष चौकशीचे निर्देश दिले. या घटनेचे राजकारण करणे चुकीचे असून विरोधक कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन करताना, शिंदे यांनी पोलिसांनी निर्भयपणे तपास करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

ठाण्यातील ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना पकडण्यात येत नसल्याने ठाकरे गटाने हे प्रकरण लावून धरले आहे. या प्रकरणी ठाकरे गटाने आजही ठाण्यात जोरदार आंदोलन केलं. त्यामुळे ठाण्यातील वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास कुठवर आला याची माहिती घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करत आहेत. मात्र, काही बाहेरचे लोक येऊन या प्रकरणाचं राजकारण करत असून ते दुर्देवी आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे मीडियाशी संवाद साधत होते.
पूर्णेकर यांची हत्या झाल्यानंतर मी पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्तांना फोन केला आणि या घटनेची गंभीर दखल घेतली. हा तपास निष्पक्षपातीपणे झाला पाहिजे. कुणालाही पाठीशी घालू नका, अशा सूचना मी पोलीस आयुक्ताना दिल्या होत्या, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या प्रकरणात अत्यंत जलद गतीने आरोपी पकडले आहेत. त्यांच्याकडील शस्त्र जप्त केली आहेत. पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांवर दबाव आणण्याचं काम किंवा जनतेला वेठीस धरण्याचं काम कुणी करता कामा नये. पोलिसांनी त्यांचं काम निर्भयपणे केलं पाहिजे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
राजकीय पोळी भाजली जात आहे
जनतेला देखील नाहक त्रास होता कामा नये, याची काळजी घेतली पाहिजे. वारंवार आंदोलनं करून अनेकांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. ठाण्यात बाहेरचे लोक येऊन त्रास देण्याचं काम करत आहेत. परवाच्या रात्री जाळपोळ झाली, हायवे बंद झाला. नौपाड्यात पोलिसांवर दगडफेक झाली, पोलीस जखमी झाले, सोड्याच्या बाटल्या फेकल्या गेल्या. पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखद घटनेवर काही लोक राजकीय पोळी भाजू इच्छित आहेत, हे दुर्दैवी आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
नागरिकांची गैरसोय होणार नाही
कुठल्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणं आपलं काम आहे. कुणालाही कुठेही त्रास होता कामा नये. नागरिकांची गैरसोय होता कामा नये, हे मी स्पष्टपणे सांगितलं आहे. शिवसेनेकडून कायदा-सुव्यवस्थेला कुठेही बाधा येणार नाही आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
म्हणून मिनाक्षी शिंदेंचा राजीनामा
दरम्यान, शिंदे गटाच्या नेत्या, माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मिनाक्षी शिंदे यांनी महिला आघाडीच्या संघटक पदाचा राजीनामा माझ्याकडे पाठवला आहे. या घटनेशी वारंवार नाव जोडलं जात असल्यामुळे पक्षाला त्रास होतोय, अशा भावना व्यक्त करून मिनाक्षी शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. पूर्णेकर यांची हत्या झाली, ते दुर्दैवी आणि दुःखद आहे. मात्र, त्यावर इतर राजकीय पक्ष राजकारण करत आहेत, हे आणखी दुर्देवी आहे, असं शिंदे म्हणाले.