अलेक्जेंडर पालमर निघाला अकबर हुसैनी! शास्त्रज्ञ म्हणून देशात घुसला शत्रूचा हेर, मोठा खुलासा

Mumbai Crime Branch : मुंबई गुन्हे शाखेने एका मोठा कट उधळून लावला आहे. अलेक्जेंडर पालमर उर्फ अकबर कुतुबुद्दीन हुसैनी या हेराला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. काय आहे हे हेरगिरीचे प्रकरण?

अलेक्जेंडर पालमर निघाला अकबर हुसैनी! शास्त्रज्ञ म्हणून देशात घुसला शत्रूचा हेर, मोठा खुलासा
एआय छायाचित्र
| Updated on: Oct 30, 2025 | 10:15 AM

सुरक्षा यंत्रणांनी हेरगिरीच्या एका प्रकरणाचा भांडाफोड केला. मुंबई गुन्हे शाखेने एका मोठा कट उधळून लावला आहे. अलेक्जेंडर पालमर उर्फ अकबर कुतुबुद्दीन हुसैनी या हेराला पोलिसांनी अटक केली. 21 ऑक्टोबर 2025 रोजी त्याला अटक करण्यात आली. हा अलेक्जेंडर स्वतःला आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ असल्याचा देखावा करत होता. तो परदेशी नागरीक आहे. याप्रकरणात मुंबई पोलीस, IB, RAW, MI, दिल्ली पोलीस,झारखंड पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. काय आहे हे हेरगिरीचे प्रकरण?

आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ असल्याचा भासवायचा

अकबर हुसैनी हा भारतात अलेक्जेंडर पालमर या नावाने राहत होता. तो स्वतःला आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ असल्याचे सांगत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने भारतात बोगस पासपोर्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड आणि इतर सरकारी दस्तावेज तयार केले आणि भारतीय नागरिक असल्याचे भासवले. तो मुंबईतील अंधेरी परिसरातील जुहू येथील सौर आयलँड मधील एका फ्लॅटममध्ये दीर्घकाळापासून राहत होता. त्याला अटक केली तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगा पण हजर होता. या फ्लॅटमधून पोलिसांनी बोगस ओळखपत्रे, परदेशी जाण्यासाठीची बोगस कागदपत्रं, अनेक मोबाईल फोन आणि डिव्हाईस जप्त केले. तो परदेशी हेरगिरी संस्थांमधील मोठा मासा असल्याचे समोर येत आहे.

पाकिस्तानशी थेट कनेक्शन, अनेक पुरावे मिळाले

तपास यंत्रणांना त्याच्याकडून अनेक सिमकार्ड आणि मोबाईल नंबर मिळाले. त्यातील काही पाकिस्तानचे असल्याचे समोर आले आहे. IMSI कोड आणि त्याचे इतर देशातील हेरिगिरी करणाऱ्या संस्थांशी संबंध तपासण्यात येत आहे. त्याच्याकडे कोटक महिंद्रा बँकेचे NRI खाते, SBI क्रेडिट कार्ड आणि तो अनेक कंपन्यांमध्ये मॅनेजर पदी असल्याचे बोगस प्रमाणपत्र पोलिसांनी हस्तगत केले आहे. नाशिक येथील MIDC मधील HML Corporation मध्ये तो कार्यरत असल्याचे तो दाखवत होता.

याशिवाय टाटा हार्डवेअर आणि परदेशी विद्यापीठाच्या पदव्यांचे बोगस प्रमाणपत्र पण त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. तो 2000-2009 या काळात लंडन विद्यापाठात एमबीए केल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्याचा साथीदार मुझफ्फर याच्याकडून 48 परदेशी चलनी नोटा आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. 2019 मध्ये त्याने बोगस पासपोर्ट जबलपूर येथील एका एजंटच्या मदतीने मिळवल्याची माहिती समोर येत आहे. त्याची इयत्ता दहावी, बारावी आणि BSC मॅथ्स, BEd, MA पर्यंतच्या सर्व पदव्याच संशयाच्या घेऱ्यात आल्या आहेत. नवी मुंबईतील Asia International नावाची ट्रॅव्हल एजन्सीवरही पोलिसांचे लक्ष आहे.