रायगडवरील उत्खननात मिळाली मौल्यवान बांगडी आणि पुरातन वस्तू, संभाजीराजेंची माहिती

रायगडवरील उत्खननात सोन्याची एक पुरातन मौल्यवान बांगडी मिळाली आहे. त्याची माहिती शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

रायगडवरील उत्खननात मिळाली मौल्यवान बांगडी आणि पुरातन वस्तू, संभाजीराजेंची माहिती
रायगडवरील उत्खननात मौल्यवान बांगडी आणि अन्य वस्तू सापडल्या, संभाजीराजेंची माहिती
| Updated on: Apr 02, 2021 | 8:29 PM

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावर सध्या उत्खननाचं काम सुरु आहे. आतापर्यंत गडावरील उत्खननात मौल्यवान वस्तू, भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननात सोन्याची एक पुरातन मौल्यवान बांगडी मिळाली आहे. त्याची माहिती शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. संभाजीराजे यांनी या बांगडी आणि अन्य वस्तूंचे फोटोही ट्वीट केले आहेत. (Excavations at Fort Raigad reveal valuable bracelets, Other Objects, coins)

संभाजीराजेंची ट्वीटरवरुन माहिती

“रायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननाचे महत्त्व आज पुन्हा प्रत्ययास आले. प्राधिकरणामार्फत गडावर आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अशा वस्तू मिळालेल्या आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याच्या धातूपासून बनवलेली पुरातन मौल्यवान बांगडी मिळालेली आहे. अशाप्रकारे पुढेही अनेक ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात मिळू शकतात. यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान, संस्कृती, वास्तूरचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे”, असं संभाजीराजे यांनी म्हटलंय.

‘पुरातत्व खात्याचं विशेष कौतुक’

“तसेच या वस्तू ज्याठिकाणी मिळतात, त्यावरून त्या ठिकाणाचे वास्तविक महत्त्व व माहिती समजण्यास मोलाची मदत होणार आहे. सध्या गडावर सुरु असलेल उत्खनन भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने चालू आहे, आणी या उत्खननातच या वस्तू मिळत आहेत. या प्रसंगी पुरातत्व खात्याचे विशेष कौतुक करावे असे आहे”, असं संभाजीराजे म्हणालेत.

संबंधित बातम्या :

शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या प्रकाशव्यवस्थेवरुन खासदार संभाजीराजे नाराज! पुरातत्व खात्याला फटकारलं

पौंष पौर्णिमेनिमित्त खासदार संभाजीराजेंकडून सपत्निक जेजुरीच्या खंडेरायाचा अभिषेक

Excavations at Fort Raigad reveal valuable bracelets, Other Objects, coins