मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसवर स्फोटकं, स्टेशनमध्ये एकच गोंधळ

| Updated on: Jun 05, 2019 | 3:36 PM

कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये आलेल्या हावडा-कुर्ला शालिमार एक्सप्रेस गाडीत स्फोटकं आढळली आहेत. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसवर स्फोटकं, स्टेशनमध्ये एकच गोंधळ
Follow us on

मुंबई : कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये आलेल्या हावडा-कुर्ला शालिमार एक्सप्रेस गाडीत स्फोटकं आढळली आहेत. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी पोहचून स्फोटकं ताब्यात घेतली. या स्फोटकांसोबतच एक चिट्ठीही मिळाली आहे.

कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे हावडा-कुर्ला ही रेल्वे सकाळी सव्वाआठ वाजता पोहचली. सकाळी 6 वाजता येणारी ही गाडी सव्वादोन तास उशिराने पोहचली. प्लॅटफॉर्मवर प्रवासी उतरल्यानंतर ही गाडी यार्डात आली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सफाई कर्मचारी साफसफाई करत असताना त्यांना संशयास्पद वस्तू दिसली. त्यांनी आरपीएफ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर सर्वच सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, मुंबई आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी आल्यावर त्यांना जिलेटीनच्या 5 कांड्या, वायर, बॅटरी आणि एक चिट्ठीही मिळून आली. ही स्फोटकं कोणी आणली याचा तपास सुरु आहे. सीसीटीव्हीच्या (CCTV) माध्यमातून पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, मंगळवारी रायगडमधील उरण येथे भिंतीवर आयएसआय या अतिरेकी संघटनेशी संबंधित मजकूर आढळला होता. आज लोकमान्य टिळक टर्मिनसला स्फोटकं सापडल्याने अतिरेकी संघटना सक्रिय होत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.