राज्यपाल कोश्यारी पुन्हा वादात?; चप्पल घालूनच शहिदांना अभिवादन; काँग्रेसकडून व्हिडीओ ट्विट

| Updated on: Nov 26, 2022 | 12:54 PM

आज मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या हल्ल्यातील शहिदांना विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहिली जात आहे.

राज्यपाल कोश्यारी पुन्हा वादात?; चप्पल घालूनच शहिदांना अभिवादन; काँग्रेसकडून व्हिडीओ ट्विट
राज्यपाल कोश्यारी पुन्हा वादात?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील आक्षेपार्ह विधानामुळे आधीच वादात असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणखी एका वादात सापडले आहेत. भगतसिंह कोश्यारी यांनी आज 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालूनच श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी अडचणीत सापडले आहेत. काँग्रेसने राज्यपाल कोश्यारी यांचा चप्पल घालून श्रद्धांजली वाहतानाचा व्हिडिओ ट्विट केला असून राज्यपालांच्या या कृतीवर तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

आज मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या हल्ल्यातील शहिदांना विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहिली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण केले. तसेच मुंबईतील अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना श्रद्धांजली वाहिली.

 

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायात चप्पल घालूनच हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यापाल चप्पल घालून शहिदांना श्रद्धांजली वाहत असल्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच राज्यपालांच्या या कृतीवर संतापही व्यक्त केला आहे.

 

विशेष म्हणजे हाच व्हिडिओ गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र या राज्यपालांच्या ट्विटर हँडलवरही अपलोड करण्यात आला आहे. त्यातही राज्यपाल पायात चप्पल घालूनच शहिदांना पुष्पगुच्छ अर्पण करताना दिसत आहेत.

राज्यपाल कोश्यारी पुन्हा वादात?

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.