मुंबईला मुसळधार पाऊस झोडपणार, पुढील २४ तासांसाठी पावसाचा अलर्ट, समुद्रात लाटा उसळणार

Mumbai Weather: मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईच्या समुद्रात आज लाटा उसळणार आहे. त्यामुळे किनारी भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र पावसाचा ब्रेक असणार आहे.

मुंबईला मुसळधार पाऊस झोडपणार, पुढील २४ तासांसाठी पावसाचा अलर्ट, समुद्रात लाटा उसळणार
| Updated on: Jun 03, 2025 | 9:05 AM

Mumbai Weather: मुंबईसह राज्यात मे महिन्यात दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर राज्यात मान्सूनची वेळेपूर्वीच एन्ट्री झाली होती. परंतु जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. आता मुंबईत पावसाचे आगमन होणार आहे. हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासांसाठी पावसाचा अलर्ट दिला आहे. तसेच समुद्रात लाटा उसळणार असल्याचे म्हटले आहे.

मे महिन्याच्या अभूतपूर्व पावसानंतर आता जूनच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईत मान्सून सक्रीय होणार आहे. मान्सून ८ ते ११ जून दरम्यान मुंबईत पूर्णपणे सक्रिय होण्याचा अंदाज आहे. तसेच ३ जून रोजी प्री-मान्सून पावसाचा प्रभाव मुंबईत दिसणार आहे. मुंबई व उपनगरांमध्ये मंगळवारी ढगाळ वातावरण आहे. दमट हवामानामुळे उकाडा वाढला आहे. परंतु मुंबईत पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी रेनकोट-छत्री सोबत ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आठवड्याभरात मुंबईसह आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण राहणार आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

समुद्रात लाटा उसळणार

मुंबईच्या समुद्रात आज लाटा उसळणार आहे. समुद्रकिनारी जाणाऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवारी भरतीच्या वेळी ३.१२ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३°C आणि २६°C च्या आसपास असेल. मुंबईत पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. दादर परिसरात सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे.

विदर्भात पावसाचा ब्रेक

नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी विदर्भात येत्या ४ ते ५ दिवस पावसाचा खंड पडणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना पावसाच्या आगमानाची वाट पाहवी लागणार आहे. विदर्भातील तापमानात थोडी वाढ होणार आहे. स्थानिक परिस्थितीमुळे काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. १० जून दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात बदल होणार आहे. त्यानंतर पाऊस सक्रीय होणार आहे. जून महिन्यात साधारण पाऊस राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.