चाकरमान्यांना गावाला जाण्याची घाई, एसटी, रेल्वेला गर्दी वाढली, खासगी बसकडून प्रवाशांची लूट

उन्हाळ्याच्या सुट्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली असून, याचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सला होताना दिसून येत आहे. खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवासी भाड्यात मोठी वाढ करण्यात आली आहे.

चाकरमान्यांना गावाला जाण्याची घाई, एसटी, रेल्वेला गर्दी वाढली, खासगी बसकडून प्रवाशांची लूट
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: google
| Updated on: May 13, 2022 | 7:48 AM

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्या (Summer vacation) लागल्या आहेत. उन्हाळ्यांच्या सुट्यामध्ये अनेक जण कुठेतरी पर्यटनाचा (Tourism) किंवा गावी जाण्याचा बेत आखत असतात. उन्हाळ्यात शाळेला (School) सुटी असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांसोबत पर्यटनाचा आनंद घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या बस आणि रेल्वे गाड्यांना गर्दी असते. आता याचाचा फायदा हा खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या घेताना दिसून येत आहे. सध्या बस आणि रेल्वेला होणारी गर्दी पहाता, खासगी बसेसकडून प्रवास भाड्यात अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आली आहे. मात्र सध्या लालपरी आणि रेल्वेला होणारी गर्दी पहाता अनेकांकडे केवळ खासगी बसेसचा पर्याय शिल्लक असल्याने अव्वाच्या सव्वा भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. या बसेसच्या भाडेवाढीवर नियंत्रण अणावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. खासगी बस वाहतूकदारांनी प्रवाशांकडून किती भाडे आकारावेत याबाबत नियम ठरले असताना देखील या नियमांना मोडीत काढत प्रवाशांची लूट सूर असल्याचे चित्र आहे.

कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल

दरम्यान सध्या उन्हाळी सुटी असल्याने मुंबईतील अनेक चाकरमानी मुलांसह आपल्या कोकणातील गावी सुट्या घालवण्याचा बेत आखत आहेत. त्यामुळे मुंबईतून कोकणात येणाऱ्या सर्वच गाड्यांना मोठी गर्दी आहे. रेल्वे विभागाच्या वतीने सुट्या लक्षात घेऊन कोकणासाठी काही स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. मात्र यातील अनेक ट्रेन या फक्त विकएंडलाच असल्यामुळे रेल्वेमध्ये आरक्षीत सीट मिळणे कठिण झाले आहे. दुसरीकडे आता रेल्वेने विनाआरक्षित सिटांची संख्या कमी केल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना जनरल डब्यामधून देखील प्रवास करता येत नाही. एकीकडे बसला गर्दी तर दुसरीकडे रेल्वेत सर्व जागा फूल असल्यामुळे चाकरमान्यांकडे आता फक्त खासगी बसेसचा पर्याय उरला आहे.

खासगी बसकडून प्रवाशांची लूट

दरम्यान रेल्वेत आरक्षीत सीट मिळत नसल्याने तसेच बसेसला गर्दी वाढल्याने मुंबईतून कोकणात परतणाऱ्या चाकरमान्यांना आता केवळ खासगी ट्रॅव्हल्सचाच आधार आहे. त्यामुळे खासगी बसेसच्या प्रवाशी संख्येत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे यांचाच फायदा घेऊन आता खासगी बसचालकांनी मोठी भाडेवाढ केल्याचे पहायला मिळत आहे. प्रवाशांवर निर्धारीत भाड्यापेक्षा दुप्पट भाडे मोजण्याची वेळ आली आहे. या भाडेवाढीला लगाम घातला जावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.