राज्यावर दुहेरी संकट! प्रशासनाचा अलर्ट, शक्यतो घराबाहेर पडणे टाळाच, तब्बल..

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहे. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. आज राज्यावर दुहेरी संकट असल्याचे बघायला मिळतंय. उष्णतेसोबतच अवकाळी पाऊसही हजेरी लावणार आहे.

राज्यावर दुहेरी संकट! प्रशासनाचा अलर्ट, शक्यतो घराबाहेर पडणे टाळाच, तब्बल..
Heat
| Updated on: May 16, 2026 | 7:12 AM

राज्यात उष्णतेचा कहर बघायला मिळत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे उन्ह अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा मोठा इशारा दिला. मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. यासोबतच काही भागात आज देखील अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. काल तीन जिल्ह्यांमध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा, नागपूर, अकोला, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. यासोबतच धाराशिव, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आला, तिथे नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत घरातून बाहेर पडणे टाळावे. उष्माघातासंदर्भात प्रशासनाकडून काही सूचनाही जारी करण्यात आल्यात.

राज्यात मे महिन्यात सूर्य अधिक आग ओकताना दिसतोय. 45 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद होत आहे. जळगावमध्ये सलग चार दिवसांपासून तापमानाचा पारा 45 अंशाच्या पार आहे. जळगावमध्ये 45.3 अंश सेलिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. दोन दिवसांपूर्वी 45. 6 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. 45 अंशांच्यावर तापमान असल्याने उकाड्यात आणि उष्णतेत प्रचंड वाढ झाली. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले, नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा कहर होता. आता तापमानात काहीशी घट झाल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान 41 अंश सेल्सिअसवर स्थिर असून, यापूर्वी या आठवड्यात तापमानाचा पारा तब्बल 45 अंशांपर्यंत पोहोचला होता. मात्र, तापमानात घट झाली असली तरी हवेत आद्रतेचे प्रमाण कमी असल्याने उकाडा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यासह चाळीसगाव तालुक्यात वाढत्या तापमानाचा परिणाम आता थेट भाजीपाल्याच्या दरांवर दिसून येत आहे. तीव्र उष्णतेमुळे शेती पिकांवर ताण वाढला असून धरणांमधील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत असल्याने विहिरींची पाणीपातळीही घटली आहे. पाण्याअभावी भाजीपाला पिकांचे उत्पादन कमी झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घटली असून टोमॅटो, भेंडी, वांगी, मिरची, कोथिंबीर यांसारख्या भाजीपाल्यांच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

Follow Us