
तौत्के चक्रीवादळाच्या (Tauktae Cyclone) तडाख्यामुळे बॉम्बे हाय परिसरात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे बचावकार्य सुरु आहे.

हिरा ऑईल फील्डमधील ‘बार्ज पी- 305’ वर (Barge P305) अडकलेल्या जवळपास 184 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि शोध पथकांना यश आलं. अरबी समुद्रात अजूनही बचाव कार्य सुरुच आहे.

तौत्के चक्रीवादळामुळे बुडालेल्या ‘बार्ज पी- 305’वरुन कर्मचाऱ्यांची थरारक सुटका करण्यात आली. भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची (INS Kochi) आणि आयएनएस कोलकाता (INS Kolkata) या युद्धनौका, तसंच ग्रेटशिप अहिल्या (Ahilya) आणि ओशन एनर्जी (Ocean Energy) या जहाजांच्या सहाय्याने समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली.

17 तारखेलाच रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं होतं.

INS कोचीवरुन 184 जणांना समुद्र किनारी आणण्यात आले. अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपररेशन अद्यापही सुरुच आहे. बार्ज पी – 305 वरील काही जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या होत्या.

एक रात्र आणि एक दिवस पाण्यात राहिलेल्या या कर्मचाऱ्यांना वाचवण्यातही तटरक्षक दलाला यश मिळालं.

“बार्ज बुडत होते, म्हणून मला समुद्रात उडी मारावी लागली. मी 11 तास समुद्रात होतो. त्यानंतर नेव्हीने आम्हाला वाचवले” असे क्रू मेंबर अमित कुमार कुशवाहा याने सांगितले.