इंदिरा गांधींबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण

| Updated on: Jan 30, 2020 | 8:41 AM

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करत असताना आणीबाणीचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले.

इंदिरा गांधींबाबतच्या त्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण
Follow us on

बीड : “देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता”, असं वक्तव्य महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल (29 जानेवारी) बीड येथील संविधान बचाव सभेत केलं होतं. या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापत असल्याचं लक्षात येताच आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत असताना आणीबाणीचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी “देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता”, असं वक्तव्य केलं (Jitendra Awhad statement on Emergency). काल (29 जानेवारी) बीडमध्ये संविधान बचाव महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत वक्तव्य केलं. या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापत असल्याचे लक्षात येताच जितेंद्र आव्हाड यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलं.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?

“इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात देशाचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देशात कुणीही बोलायला तयार नव्हते. मात्र अहमदाबादच्या आणि पटनाच्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवला तेव्हा जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरु झालं आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले (Jitendra Awhad statement on Emergency).

शरद पवार आणि शिवसेना जितेंद्र आव्हाडांच्या मताशी सहमत असावीत – किरीट सोमय्या

जितेंद्र आव्हाड यांच्या इंदिरा गांधींबाबतच्या वक्तव्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी संधी साधत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “जितेंद्र आव्हाड यांच्या मताशी मी सहमत आहे. त्यांच्या या विधानाशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना सहमत असतील”, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला.

जितेंद्र आव्हाड यांचे स्ष्टीकरण

इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापत असल्याचे समजताच आव्हाड यांनी ट्विट करुन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आपलं वक्तव्याचं विपर्यास केलं गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणीबाणीबद्दल मतमतांतर असू शकतात. तरीही एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदिराजींची आणि मोदी-शाहांची तुलना होऊ शकत नाही. ते इंदिरा गांधी यांच्या कर्तृत्वाच्या जवळपासही पोहचू शकत नाहीत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

…तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल : अशोक चव्हाण

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्वीट केलं. “देशाची एकता अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्‍या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता आणि कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल”, असे अशोक चव्हाण म्हणाले.