
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षातील आऊटगोईंग थांबली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कल्याण-डोंबिवलीमध्ये काँग्रेसची घरघर थांबली आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेससोडून भाजप व इतर पक्षात गेलेले काँग्रेसचे पदाधिकारी पुन्हा घरवापसी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या पाठोपाठ आता भाजपचे पदाधिकारी काँग्रेसमध्ये येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश मुथा यांच्यासह शेकडो पदाधिकारी काँग्रेसचा हात पकडणार आहे.
भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश मुथा यांनी भाजपवर आरोप केले आहेत. भाजपमध्ये सर्वांना समान संधी मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही ठराविक जणांनाच संधी दिली जाते. त्यांच्याकडून भेदभाव केला जातो. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमुळे पक्षात काम करण्यास संधी मिळत नाही, असे आरोप मुथा यांनी केले आहे. यामुळे आपण पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत अल्याचे मुथा यांनी म्हटले आहे.
आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षांकडून केली होती. ते कल्याण डोंबिवलीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र 2016 मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ९ ऑगस्ट रोजी नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेस प्रवेश होणार आहे. काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली परिसरात काँग्रेस पक्षाला नवी संजीवनी मिळत असल्याची चर्चा रंगली आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी राकेश मुथा एकटेच नाही तर भाजपसह इतर पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील चार मतदार संघामधील कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी पक्ष श्रेष्ठीकडे करणार असल्याचा पुनरुच्चार जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला.