लाडकी बहीण योजनेचे केवळ एक, दोन हप्तेच दिले जाणार…शरद पवार यांनी व्यक्त केली भीती

sharad pawar press conference: लोकसभा निवडणुकी डाव्या पक्षांनी मदत केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना एकही जागा दिली नव्हती. आता त्यांच्यासाठी काही जागा सोडल्या पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेचे केवळ एक, दोन हप्तेच दिले जाणार...शरद पवार यांनी व्यक्त केली भीती
sharad pawar
| Updated on: Jul 27, 2024 | 1:01 PM

राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत. परंतु राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे निवडणुकीपुरते एक, दोन हप्ते महिलांना दिले जातील. त्यानंतर दिला जाणार का? हा प्रश्न आहे. सरकारला या योजनेचा लाभ जनतेला द्यायचा होता तर ही योजना आधीच का जाहीर केली गेली नाही, अशी चर्चा लोकांमध्ये आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

…तर लोकसभेसारखेच निकाल

आजच्या राज्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे, असे मत जनतेचे झाले आहे. यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला संधी आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही एकसंघ पर्याय दिला होता. विधानसभेसाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याला मूर्त स्वरुप आले पाहिजे. मूर्त स्वरुप आले तर लोकसभेसारखी स्थिती दिसू शकेल. नाही आले तर आजच्या राज्यकर्त्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. परंतु लोकसभेसारखा स्पष्ट निकाल लागणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. लोकसभेसारखा निकाल येण्यासाठी महाविकास आघाडीत एकी हवी आहे. लोकांना आता पर्याय द्यावा, असे तिन्ही पक्षांत एकमत आहे.

डाव्या पक्षांनाही स्थान द्यावे

संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीतील जागा वाटपावर चर्चा होणार आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली. त्यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत यांनी तडजोडीसाठी जी समिती करायची त्याची नावे दिली. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची नावे दिली. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी काही नावे दिली आहे. त्यांच्या बैठकीची प्रक्रिया १२ तारखेनंतर सुरू होईल. काही झालं तरी जागेचा निर्णय घ्यावा, एकवाक्यता ठेवावी आणि लोकांना पर्याय द्यावा हे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवलं आहे. तसेच लोकसभा निवडणुकी डाव्या पक्षांनी मदत केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना एकही जागा दिली नव्हती. आता त्यांच्यासाठी काही जागा सोडल्या पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाबरोबर लिंगायत, धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण द्यावे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. धनगर, लिंगायत, मुस्लिम हे त्या प्रक्रियेत आले, तर ती परिस्थिती बदलेल आणि कटुता राहणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.