मुंबईच्या राणी बागेत गुजरातच्या सिंहांची गर्जना होणार, काय आहे नेमकी योजना ?

मुंबईच्या भायखळा प्राणीसंग्रहालयात लवकरच आशियाई सिंहांची गर्जना ऐकू येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुजरात येथील सिंहांना राणीच्या बागेत आणण्याची योजना आकाराला येऊ घातली आहे. काय आहे ही नेमकी योजना...

मुंबईच्या राणी बागेत गुजरातच्या सिंहांची गर्जना होणार, काय आहे नेमकी योजना ?
lion file photo
| Updated on: May 25, 2026 | 9:18 PM

मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्राणीसंग्रहालयात लवकरच आशियाई सिंहांची गर्जना ऐकू येण्याची शक्यता निर्माण झाला आहे. गुजरात येथील सक्करबाग झूलॉजिकल पार्क आणि मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान यांच्यात प्राण्यांच्या अदलाबदलीचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव पुढे आला आहे. या प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या प्राणीसंग्रहालय प्रशासनाने अधिकृत संमती दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच राणीच्या बागेत पर्यटकांना सिंह पाहाता येणार आहेत.

गुजरातमधील सक्करबाग झूलॉजिकल पार्क आणि मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान यांच्यात लवकरच प्राण्यांची  अदलाबदल होणार आहे.  यासाठी मुंबई महापालिकेच्या प्राणीसंग्रहालय प्रशासनाने होकार दिला आहे.  गुजरातमधील सक्करबाग झुलॉजिकल पार्क येथून मुंबईच्या राणी बागेत दोन नर आणि दोन मादी असे एकूण चार आशियाई सिंह आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या सिंहांच्या बदल्यात मुंबईतून दोन नर मादी जिराफ, एक नर आणि एक मादी भारतीय एकशिंगी गेंडा किंवा तीन मादी कॅपुचिन माकडे गुजरातला देण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे.

भायखळा प्राणीसंग्रहालय प्रशासनाने या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सर्व आवश्यक कायदेशीर परवानग्या, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या (CZA) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन,क्वारंटाईन प्रक्रिया आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याची तयारी दर्शवली आहे.विशेष म्हणजे, परदेशातून आणण्यात येणाऱ्या कॅपुचिन माकडांना भारतात आल्यानंतर थेट सक्करबाग प्राणीसंग्रहालयात नेऊन तिथेच क्वारंटाईन आणि इतर प्रक्रिया करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

यामुळे प्राण्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल आणि त्यांना नवीन वातावरणाशी जुळवून घेणे सोपे जाईल,असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यास, मुंबईकरांना भायखळा प्राणीसंग्रहालयात आशियाई सिंहांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार असून प्राणीसंग्रहालयाच्या आकर्षणात आणखी भर पडणार आहे. सध्या या अदलाबदलीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Follow Us