गणेशोत्सवासाठीच्या कोकणातील एसटीच्या विशेष गाड्यांना चाकरमान्यांचा अल्प प्रतिसाद

| Updated on: Jul 20, 2021 | 10:45 AM

Konkan ST | सध्या करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि पुन्हा  नियमांचा ससेमिरा असण्याच्या शक्यतेने यंदा गणेशोत्सवाला जाणाऱ्या गाडय़ांना सुरुवातीपासून कमी प्रतिसाद मिळत असेल असा अंदाज एस.टी. महामंडळाकडून व्यक्त केला जात आहे.

गणेशोत्सवासाठीच्या कोकणातील एसटीच्या विशेष गाड्यांना चाकरमान्यांचा अल्प प्रतिसाद
कोकण एसटी
Follow us on

मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीकडून विशेष गाड्या सोडण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या बससेवेला चाकरमान्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. एरवी गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav 2021) काळात कोकणातील एसटी गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल असते. मात्र, यंदा या गाड्यांच्या आरक्षणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

आरक्षण सुरु झाल्यापासून चार दिवसांमध्ये मुंबई व ठाण्याच्या विविध आगारातील अवघ्या दहा एस.टी. पूर्णपणे आरक्षित झाल्या आहेत. पालघरमधून एकाही गाडीचे आरक्षण झालेले नाही. येत्या 10  सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त एस.टी. महामंडळाकडून कोकणासाठी 2200 गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. यात साधारण 800 ते 900 गाडय़ा मुंबई, ठाणे, पालघरमधून कोकणासाठी जातील. तर 1200 ते 1300 गाडय़ा कोकणातून मुंबईत येतील.

मुंबईतून जाणाऱ्या व येणाऱ्या गाडय़ांचे आरक्षण 16 जुलैपासून सुरू झाले आहे. गणेशोत्सवासाठी 4 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2021 दरम्यान जादा गाडय़ांचा प्रवास सुरू राहील. तर 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान या गाडय़ा कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. एकूण बसगाडय़ांपैकी पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, पालघर विभागातील आगारातून 588 गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. यात मुंबईतील आगारातून 150 गाडय़ा आरक्षणासाठी उपलब्ध केल्या आहेत.

आतापर्यंत या भागातून पाच गाडय़ा पूर्णपणे आरक्षित झाल्या आहेत. तर ठाण्यातील विविध आगारातूनही 379 गाडय़ांचे आरक्षण उपलब्ध करताना केवळ पाच गाडय़ांचे आरक्षण आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालघरच्या वेगवेगळ्या आगारातील 59 बसगाडय़ांपैकी एकही गाडी आरक्षित झालेली नाही.

सध्या करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि पुन्हा  नियमांचा ससेमिरा असण्याच्या शक्यतेने यंदा गणेशोत्सवाला जाणाऱ्या गाडय़ांना सुरुवातीपासून कमी प्रतिसाद मिळत असेल असा अंदाज एस.टी. महामंडळाकडून व्यक्त केला जात आहे. गट आरक्षणाला सुरुवात नाही एस.टी. महामंडळाकडून गट आरक्षणासाठी बस उपलब्ध केल्या नाहीत.

संबंधित बातम्या:

कोकणात गणेशोत्सवासाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडा, शेलारांचे दानवेंना साकडे

बाप्पा पावला! गणेशोत्सावात कोकणात जाण्यासाठी 72 स्पेशल गाड्या सोडणार; रावसाहेब दानवे यांची घोषणा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा, मध्य रेल्वेकडून स्पेशल गाड्या