महाविकास आघाडीचं मिशन नवी मुंबई, तिन्ही पक्षांचा एकत्र मेळावा

| Updated on: Feb 04, 2020 | 8:13 AM

नवी मुंबई महापालिकेच्या एप्रिल महिन्यात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सध्या सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.

महाविकास आघाडीचं मिशन नवी मुंबई, तिन्ही पक्षांचा एकत्र मेळावा
Follow us on

नवी मुंबई : आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे (Maha Vikas Aghadi Karyakarta Melava). हा मेळावा मंगळवारी (3 फेब्रुवारी) वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकाच सभागृहात दिसणार आहेत (Maha Vikas Aghadi Karyakarta Melava).

नवी मुंबई महापालिकेच्या एप्रिल महिन्यात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सध्या सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, “महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत”, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

शरद पवारांची तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांसोबत बैठक

दरम्यान, आज (3 फेब्रुवारी) संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची महाविकास आघाडींच्या नेत्यांसोबत वाय बी चव्हाण सेंटर इथे बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवतील, असा निर्णय झाल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली.

महाविकास आघाडीचे ‘एक वार्ड, एक नगरसेवक’ धोरण

मनपा निवडणूक ‘एक वार्ड, एक नगरसेवक’ या पद्धतीने घेण्याविषयी महाविकास आघाडी सरकारने याआधीच निर्णय घेतला आहे. याआधी वार्ड स्तरावर आढावा बैठक घेण्यात आली होती. निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढविणार आहे. त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष आणि इतर सहकारी पक्ष एकत्रितपणे येवून प्रत्येक प्रभागात एकच उमेदवार देणार आहेत. सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत संदेश देण्यासाठी आणि निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी या सर्व पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

भाजपकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात

दुसरीकडे नवी मुंबई मनपामध्ये एकहाती सत्ता असणाऱ्या भाजपने देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली करायला सुरुवात केली आहेत. भाजप नेते गणेश नाईकांनी भाजपच्या 50 नगरसेवकांची नवी मुंबईतील क्रिस्टल हाऊस येथे गुप्त बैठक आयोजित केली. महाविकास आघाडीचा रथ रोखण्यासाठी ब्लूप्रिंट तयार करण्यात आली आहे. नाईक परिवारातर्फे युवा नेतृत्व करणाऱ्या सागर नाईक, वैभव नाईकला यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.

“आमचा एकही नगरसेवक कुठे जाणार नाही. सगळे नगरसेवक भाजपसोबत आहेत. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नाराज असल्याने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, भाजपला या मेळाव्याचा काही फरक पडणार नाही. गणेश नाईकांसोबत असलेल्या 50 नगरसेवकांसमोर आघाडीचे ताकदवार उमेदवार नाहीत. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीत भाजपचे 70 ते 75 नगरसेवक निवडून येतील आणि महापालिकेत भाजपची सत्ता येईल”, असा दावा भाजपचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केला.

मनसेकडूनही निवडणुकीची तयारी

दरम्यान, मनसेकडूनही निवडणुकीची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मनसे नेते अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत 6 हजार 500 कंत्राटी कामगारांना 14 महिने थकबाकी मिळाली. त्यामुळे मनसेतर्फे निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे.