मानापमानानंतर महाट्विस्ट, अखेर महाविकास आघाडी बॅकफूटवर; प्रकाश आंबेडकरांना दिलं ‘ते’ पत्र

महाविकास आघाडीत नवा ट्विस्ट आलेला बघायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीला आजच्या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलं. पण वंचितच्या नेत्यांना बैठकीत सहभागी न करता बाहेर एक तास बसवून ठेवण्यात आलं. त्यामुळे वंचितचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी वंचितचा अपमान करण्यात आला, असं म्हणत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता महाविकास आघाडी बॅकफूटवर आली आहे.

मानापमानानंतर महाट्विस्ट, अखेर महाविकास आघाडी बॅकफूटवर; प्रकाश आंबेडकरांना दिलं ते पत्र
| Updated on: Jan 30, 2024 | 6:14 PM

मुंबई | 30 जानेवारी 2024 : महाविकास आघाडीत सध्या नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आली. या बैठकीचं अधिकृत निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला देखील देण्यात आलं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर हे या बैठकीला आले. पुंडकर यांनी वंचितचा अजेंडा सर्वांसमोर ठेवला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना बाहेर बसवलं. आम्ही चर्चा करुन सांगतो, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुंडकर यांना सांगण्यात आलं. त्यानंतर पुंडकर यांना तब्बल 1 तास बैठकीच्या बाहेर बसवण्यात आलं. त्यामुळे धैर्यवर्धन पुंडकर नाराज झाले. ते आणखी जास्त वेळ वाट न बघता ट्रायडेंट हॉटेलमधून बाहेर पडले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना आपली नाराजी व्यक्त केली. वंचित बहुजन आघाडीला बैठकीला बोलावून अपमान केला, अशी भूमिका धैर्यवर्धन पुंडकर यांनी मांडली.

धैर्यवर्धन पुंडकर यांच्या भूमिकेमुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी खरंच महाविकास आघाडीत सहभागी होणार की नाही? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागला. अखेर याबाबत सर्वत्र चर्चा सुरु झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विटरवर एक पत्र ट्विट केलं. संबंधित पत्र हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना पाठवण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं. या पत्रात त्यांना महाविकास आघाडीत अधिकृतपणे सहभागी होण्याबाबत साद घालण्यात आली. त्यामुळे मनापमानाच्या नाट्यानंतर महाविकास आघाडीत आता नवा ट्विटस्ट आला आहे.

महाविकास आघाडी बॅकफूटवर

या निमित्ताने महाविकास आघाडी बॅकफूटवर आल्याचं बघायला मिळत आहे. कारण प्रकाश आंबेडकर हे गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांना वंचितला आपल्यासोबत महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्याचं आवाहन करत होते. त्यानंतर आज बैठकीत झालेल्या घडामोडींनंतर प्रकाश आंबेडकर वेगळा निर्णय घेऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात होता. प्रकाश आंबेडकर यांनी तसा निर्णय घेण्याआधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आंबेडकरांना पत्र पाठवून महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी साद घालण्यात आली. या पत्रावर नाना पटोले, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि संजय राऊत यांची स्वाक्षरी आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

“देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडी ची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे”, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

“३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे”, असं पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे. या पत्रातनंतर महाविकास आघाडीची येत्या 2 फेब्रुवारीला पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत स्वत: प्रकाश आंबेडकर सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.