
राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार कधी होणार? या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु आहेत. याशिवाय आमदारांकडून मंत्रिमंडळ विस्तारासाठी आग्रही भूमिका असल्याने राज्य सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करणं जरुरीचं असणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला संधी दिली जाते? ते आता पाहावं लागणार आहे. कारण शिंदे गटाचे अनेक आमदार हे मंत्रिपदाच्या आशेपोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याची चर्चा आहे. अनेक आमदारांनी याआधी उघडपणे इच्छा देखील व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी मंत्रिमंडळ विस्तार होणार होता. पण ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत एन्ट्री मारली आणि शिवसेनेच्या आमदारांचा हिरमोड झाला. याबाबतची खंत स्वत: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी नुकतंच शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला किती मंत्रीपदं मिळतात? कुणाकुणाला संधी मिळते? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्य सरकारचा रखडेला मंत्रिमंडळ विस्तार आता होण्याची शक्यता आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. पण आज अधिवेशनाचा पहिला दिवस उजाडला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच नाही. राज्य सरकारमधील अनेक आमदारांची मंत्रिपदासाठी आशा आहे. अनेकजण मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत आहेत. या आमदारांचा विचार आता सरकार नक्कीच करणार आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिवेशनानंतर दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. तिथे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत एकनाथ शिंदे यांची चर्चा होईल. त्यानंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारातून राज्याला 14 नवे मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपला 6 ते 8 मंत्रीपदं, शिंदे गटाला 4 तर अजित पवार गटाला 2 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात प्रत्येक पक्षाकडून कुणाकुणाला संधी दिली जाते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.